औरंगाबाद : शहरातील संपूर्ण कचरा उचलणे आणि प्रक्रिया केंद्रांवर नेऊन टाकणे या कामासाठी मनपा प्रशासनाने बंगळुरू येथील पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीची नियुक्ती अंतिम केली आहे. कंपनीने वाटाघाटीत १८६३ रुपये प्रतिटन कचरा उचलण्याचे मान्य केले. दररोज ८ लाख ३७ हजार रुपये मनपा फक्त कचरा उचलण्यासाठी खर्च करणार आहे. वार्षिक खर्च ३० कोटी १६ लाख रुपयांपर्यंत जात आहे.
कचरा संकलनासाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या निविदा प्रक्रियेत पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीने १८७२ रुपये प्रतिटन दर भरले होते. स्वच्छता कॉर्पोरेशन बंगळुरू या दुसऱ्या कंपनीने १९७९ रुपये प्रतिटन असे दर भरले होते. महापालिकेने पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीसोबत वाटाघाटी केली. त्यात कंपनीने ९ रुपये दर कमी करण्याची तयारी दर्शविली. १८६३ रुपये दर अंतिम करण्यात आले. मनपा प्रशासन लवकरच संपूर्ण कचरा उचलण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करणार आहे. मंगळवार २५ सप्टेंबर रोजी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीतच हा प्रस्ताव यावा यादृष्टीने राजकीय हालचाली सुरू आहेत. पी. गोपीनाथ रेड्डी या कंपनीला स्वत:ची वाहने कचरा उचलण्यासाठी आणावी लागतील.
यापूर्वी महापालिकेने हैदराबाद येथील रॅमकी कंपनीला अशाच पद्धतीचे काम दिले होते. दरवर्षी फक्त ११ कोटी रुपये कंपनीला द्यावे लागत होते. मनपाने अक्षरश: या कंपनीला पिटाळून लावले. आता मनपाने दरवर्षी ३० कोटी रुपये खर्च करून नवीन कंपनीला काम देण्याचा निर्णय घेतला आहे. बंगळुरू येथील कंपनीला अद्याप स्थानिक ‘कचरा सेठ’मंडळींचे सहकार्य लाभलेले नाही. स्थानिक कंत्राटदारांसोबत काम करण्यासाठी कंपनी जोरदार प्रयत्न करीत आहे.
दररोज एक रुपया करकंपनी शहरातील प्रत्येक मालमत्ताधारकांकडून कचरा जमा करणार आहे. यासाठी नागरिकांना दररोज एक रुपयाप्रमाणे महिना ३० रुपये द्यावे लागणार आहेत. हा पैसा मनपा वसूल करणार का कंपनी हे अद्याप उघड झालेले नाही. हा पैसा मनपा ठेवून घेणार का कंपनीला देणार हेसुद्धा प्रशासनाने उघड केलेले नाही.
कंपनीला असे मिळणार पैसेदररोज - ८,३७,९००महिना - २,५१,३७,०००वार्षिक - ३०,१६,४४,०००