औरंगाबाद : महापालिका प्रशासन, राज्य अग्निशमन कार्यालय, महापालिका प्रशासक यांच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र तयार करून अग्निशमन विभागात तब्बल १२ तरुणांना नियुक्ती देण्याचा बनावट प्रकार प्रशासक आस्तिक कुमार पांडे यांनी गुरुवारी समोर आणला. बनावट नियुक्तीपत्र घेणाऱ्या १२ जणांवर सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
अग्निशमन विभागाचे प्रमुख आर. के. सुरे यांनी सिटीचौक पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, महापालिकेच्या लेटरहेडवर १२ जणांना अग्निशमन विभागात नोकरी देण्यात आल्याचे बनावट नियुक्तीपत्र अज्ञाताने दिले आहे. त्यावर प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांची स्वाक्षरी आहे. ही स्वाक्षरी बनावट असून, लेटरहेडवरील आवक -जावक क्रमांकदेखील खोटा आहे. या नियुक्त्यांची माहिती पाण्डेय यांना व्हॉटस्ॲपवर गुरुवारी मिळाली. पाण्डेय यांनी त्याची दखल घेत पोलिसात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले.
काय आहे घोटाळा
अग्निशमन विभागाशी निगडित वेगवेगळे प्रशिक्षण वर्ग खासगी संस्थांमार्फत चालविले जातात. कुणी तरी संस्थाचालकाने आपल्या विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून महापालिका प्रशासकाच्या नावाचे बनावट लेटर पॅड तयार केले. त्यावर बारा विद्यार्थ्यांना नियुक्ती दिली. महापालिका प्रशासक यांची सही आणि शिक्काही बनावट आहे. त्या सोबत ‘मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ’ असे मोठ्या अक्षरात लिहिलेले एक पत्रदेखील आहे. या पत्रावर औरंगाबाद महापालिकेंतर्गत महाराष्ट्र अग्निशमन सेवा विभागातील प्रलंबित उमेदवारांमध्ये सामील होण्याबद्दलचे निकीता नारायण घोडके यांना पत्र देण्यात आले आहे. न्यायालयाच्या पत्रात लिपिक, सहायक व विभाग अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या स्वाक्षऱ्यादेखील बनावट आहेत, असे सुरे यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
शपथविधी ही...
ज्या १२ जणांना नियुक्ती पत्र देण्यात आले, त्यांचा शपथविधी करण्याबाबत पालिकेच्याच लेटरहेडवर आयुक्तांच्या स्वाक्षरीने मुख्य अग्निशमन अधिकारी आर.के. सुरे यांच्या नावाने पत्र आहे. उमेदवारांच्या शपथविधीसाठी नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, राज्याच्या अग्निशमन विभागातील संचालक प्रभात रहागडाले, वरिष्ठ प्रशिक्षक के.आर. हत्याळ, मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण उपस्थित राहतील, असे म्हटले आहे. १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता शपथविधी सोहळा होईल, असे पत्रात म्हटले आहे. प्रत्येक पत्रावरील सह्या खोट्या आहेत.
बनावट ओळखपत्रही दिले
उमेश प्रमोदराव चव्हाण या तरुणाला तर चक्क स्टेशन ऑफिसर असे पदनाम देऊन ओळखपत्रदेखील दिले आहे. प्रतीक चव्हाण यास आयुक्तांच्या स्वाक्षरीने नियुक्तीपत्र दिले आहे.
हे आहेत १२ उमेदवार
उमेश प्रमोदराव चव्हाण, निकीता नारायण घोडके, रोहन शिवाजी जाधव, सोपान उत्तम खांडेभराड, नितीन ज्ञानेश्वर महालकर, सचिन ज्ञानेश्वर महालकर, शुभांगी विनोद चव्हाण, प्रतीक प्रमोद चव्हाण, वैभवी दत्तात्रय चौबे, विशाल राम तायडे, मृणाल चंद्रकांत पवार, ओमकार संजयराव जोशी यांच्या विरोधात भादंवि कलम ४२०, ४६७, ४६८, ४७१ व ३४ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-