औरंगाबाद: महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीने तातडीने शहराध्यक्ष पदी माजी नगरसेवक, माजी कार्याध्यक्ष ख्वाजा शरफोददीन यांची नियुक्ती केली. शहरात एमआयएमचे वाढते प्रस्थ रोखण्याचे मोठे आव्हान ख्वाजा शरफोददीन यांच्या समोर असेल.
तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण होण्यापूर्वीच विजय साळवे यांनी आज सकाळी शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते आज दुपारी मुंबईत ख्वाजा शरफोददीन यांना नियुक्तीपत्रही देण्यात आले. यावेळी जिल्ह्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसची बडी मंडळी उपस्थित होती. त्यात शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, प्रदेश सरचिटणीस मुश्ताक अहमद, वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष सुधाकर सोनवणे, शहर उपाध्यक्ष मोहम्मद हबीब(मुन्नाभाई) आदींचा समावेश होता.
ख्वाजा शरफोद्दीन यांनी सादातनगर, सिल्कमिल कॉलनीचे महापालिकेत नेतृत्त्व केले. २०१५ साली त्यांच्या पत्नी निवडून आल्या. त्या आधी स्वत: ख्वाजा शरफोददीन हे मोठ्या मताधिक्याने निवडून आले होते व वाॅर्डात विकासाची अनेक कामे मार्गी लावली होती.