छत्रपती संभाजीनगर : पदवी घेऊनही बेरोजगार विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. या योजनेंतर्गत महापालिकेच्या विविध विभागांमध्ये २८१ विद्यार्थ्यांची नेमणूक करण्यात आली. या विद्यार्थ्यांना प्रशिक्षणासह सहा महिने शासन मानधनही देणार आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लाडकी बहीण, वयोश्री, युवा कार्य प्रशिक्षण, आदी अनेक योजना सुरू केल्या आहेत. छत्रपती संभाजीनगर महापालिकेला युवा कार्य प्रशिक्षण योजनेत २८१ विद्यार्थी नेमण्यास मंजुरी दिली असून, सर्व विद्यार्थी नेमण्यात आले. यामध्ये सर्वाधिक लिपिक टंकलेखक म्हणून ५० जण, बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी १५, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) १५, कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी) १०, कनिष्ठ अभियंता विद्युत (१०), कनिष्ठ अभियंता (सॉफ्टवेअर) ७, स्टाफ नर्स १०, औषध निर्माण अधिकारी १३, समूह संघटक १३, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक ३५, स्वच्छता निरीक्षक १५, शिक्षक २१, आदी जागांवर विद्यार्थी नेमले आहेत. मागील काही दिवसांपासून हे विद्यार्थी संबंधित विभागात कामही करीत आहेत. काही विभागात एवढे विद्यार्थी नेमले आहेत, त्या विभागात बसायलाही जागा नाही. या विद्यार्थ्यांना दैनंदिन कामाचा कोणताही अनुभव नाही. त्यामुळे त्यांना नेमके काय काम द्यावे असा प्रश्न संबधित विभागप्रमुखांना पडला आहे. महापालिकेचे दैनंदिन कामकाज हे विद्यार्थी जवळून पाहत आहेत. दोन ते तीन महिन्यांनंतर त्यांना कामाची माहिती होईल. त्यानंतर काही जबाबदाऱ्या त्यांच्यावर सोपविण्यात येणार आहेत.
शासन आदेशानुसार नेमणूकशासनाने विविध संवर्गातील विद्यार्थ्यांनी प्रशिक्षणार्थी म्हणून नेमणूक करण्याचे आदेश दिले. त्यानुसार २८१ जागा भरण्यात आल्या आहेत. आता जागा शिल्लक नाहीत.- राहुल सूर्यवंशी, उपायुक्त मनपा.