औरंगाबाद : महावितरणचे औरंगाबाद येथे कार्यरत सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण यांची औरंगाबाद जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. निवडीत राजकीय लॉबिंग होत असल्याची चर्चा रंगल्याने जिल्हाधिकारी पदी कोणाची नियुक्ती होईल याबद्दल प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती. मागील आठवड्यात उदय चौधरी यांची मंत्रालयात उपसचिवपदी बदली झाल्यानंतर जिल्हाधिकारी पद रिक्त होते.
राजकीय समीकरणातून जिल्हाधिकारीपदी नियुक्ती होणार असल्यामुळे नियुक्ती होण्यात विलंब झाल्याचे पुढे आले होते. या पदासाठी पाचहून अधिक अधिकाऱ्यांची नावे चर्चेत होती. यात महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक सुनील चव्हाण, प्रेरणा देशभ्रतार, जे. श्रीकांत, एम.डी. सिंग, औरंगाबाद महापालिका प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय आणि जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांची मुख्य नावे होती. आगामी काळात होणाऱ्या ग्रामपंचायत तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने जिल्हाधिकारी उपयुक्त ठरावे असे शिवसेना नेत्यांना वाटत होते. यामुळे जिल्हाधिकारीपदासाठी कोण असावे, यासाठी जिल्ह्यातील शिवसेनेची नेतेमंडळी प्रयत्नशील होते. तसेच सरकारमधील इतर दोन पक्ष कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांचेही मत विचारात घ्यावे लागणार असल्याने नियुक्ती लांबत होती. अखेर चव्हाण यांच्या नावावर एकमत झाल्याने त्यांची निवड करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
मनपा आयुक्तांचेही नाव होते चर्चेतबुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर औरंगाबाद जिल्हाधिकारीपदी कुणाची नियुक्ती करायची, याबाबत मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांत चर्चा झाली. त्यामध्ये मनपा प्रशासक आस्तिकुमार पाण्डेय यांचे नावही पुढे आले होते. परंतु, ते आयुक्तपदी येऊन काही महिनेच झाले आहेत. त्यामुळे त्यांचे नाव मागे पडल्याची माहिती सूत्रांनी दिली.
कोरोना काळात प्रभारी जिल्हाधिकारी काम करत होतेबदली, नियुक्ती ही प्रशासकीय बाब असली तरी पहिल्यांदाच जिल्हाधिकारीपदासाठी राजकीय आणि प्रशासकीय लॉबिंग सुरू झाले होते. मात्र, जिल्ह्याच्या ३०८ गावांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. ग्रामीण भागात अद्यापही परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. किंबहुना ती अधिक बिघडण्याची चिन्हे आहेत. अशा परिस्थितीत प्रभारी जिल्हाधिकारी काम करीत होते. दरम्यान, जिल्ह्यात १८ हजारांच्या पुढे कोरोनाग्रस्तांचा आकडा सरकला, ग्रामीण भागात ५ हजार ७०० रुग्ण आहेत. यामुळे जिल्हाधिकारी नियुक्तीला होत असलेल्या विलंबाबद्दल नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती.