औरंगाबाद : आपल्यासमाेर बसून, आपल्या डोळ्यांदेखत आपला हा मित्र काही वर्षांपूर्वी लिहिता झाला होता. झरझर वर्षे सरली आणि कागदावरचा बबऱ्या उर्फ बब्रुवान रूद्रकंठावार नकळत वाचकांच्या मनात शिरून पाहता पाहता २५ वर्षांचा झाला. अशा या पंचविशीतल्या बब्रुवानचा ऊर्फ ५५ वर्षीय ‘धनू’चा सत्कार करण्याचा अनोखा योग त्यांच्या मित्रमंडळींनी रविवार, दि. २४ रोजी जुळवून आणला होता.
संडे क्लबच्यावतीने राजहंस प्रकाशन कार्यालयात हा छोटेखानी कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमात शाम देशपांडे, महेश देशमुख, जयदेव डोळे, प्रवीण बर्दापूरकर, शाहू पाटोळे, सारंग टाकळकर या मित्रजनांनी ज्येष्ठ साहित्यिक सुधीर रसाळ, न्या. नरेंद्र चपळगावकर आणि डॉ. भगवान महाजन या ज्येष्ठांच्या हस्ते लेखक बब्रुवान रूद्रकंठावार उर्फ धनंजय चिंचोलीकर यांचा सत्कार केला. या मैत्रीपूर्ण सत्काराने मुळातच मितभाषी असलेले बब्रुवान यांचे व्यक्तिमत्त्व आणखीनच अबोल झाले होते, पण मनातल्या मनात सुखावले होते.
धनंजय चिंचोलीकर हे नाव बाजूला सारून यातून नेमका बब्रुवान रूद्रकंठावारचा जन्म कसा झाला, याची रंजक माहिती खुद्द बब्रुनेच उपस्थितांना सांगितली. नांदेडमध्ये असताना बब्रुवान आणि रूद्रकंठावार ही दोन वेगवेगळी माणसे त्यांना माहिती होती. बब्रुवान नाव असणाऱ्यांमध्ये रूद्रकंठावार आडनाव नसते आणि रूद्रकंठावार आडनाव असणाऱ्यांमध्ये बब्रुवान नाव नसते. म्हणून ही दोन नावे त्यांनी एकत्र आणली आणि त्यातूनच बब्रुवान रूद्रकंठावार हे खऱ्या अर्थाने एकदमच नवे कोरे, करकरीत पात्र उभे राहिले.
चौकट :
बबऱ्याचे लेखन अस्वलासारखे
वरवर पाहता बब्रुवान यांचे लेखन विनोदी वाटत असले तरी ते अस्वलासारखे आहे. हसण्याच्या नादात ते माणसाला गुदगुल्या करून कधी फाडून टाकते, हे लक्षातही येत नाही. अचाट निरीक्षणशक्ती, भाषाशैली आणि विनोदातून मार्मिकतेवर ठेवलेले बोट ही ‘धनू’च्या लेखन शैलीची वैशिष्ट्ये त्यांच्या मित्रमंडळींनी एकमुखाने मान्य केली.
चौकट :
चि. वी. जोशींनंतर बब्रुवानच
चि. वी. जोशी हे असे विनोदी लेखक होते, जे कायम गंभीर मुद्रेत असायचे. त्यांना हसताना फारच कमी जणांनी पाहिले असेल. चि. वी. जोशी यांच्यानंतर बब्रुवानच असे धीरगंभीर मुद्रेचे विनोदी लेखक आहेत, अशा शब्दात ज्येष्ठ समीक्षक सुधीर रसाळ यांनी चिंचोलीकर यांचा गौरव केला. चिंचोलीकर यांनी ग्रामीण संवेदनशीलतेतून सगळ्या जगाकडे पाहिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.
फोटो ओळ :
मित्रमंडळींनी ‘ब्रब्रु’ लिहिलेला शर्ट धनंजय चिंचोलीकर यांना भेट दिला.