छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर ते पुणे या नवीन (एक्स्प्रेस-वे) द्रुतगती महामार्गाची २२ महिन्यांपूर्वी घोषणा झाली होती. त्या महामार्गाला मंजुरी दिली असून, बीओटीवर हा मार्ग बांधण्याचे निश्चित झाल्याचे केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी सोमवारी लोकमतशी बोलताना सांगितले.
उद्योजक विवेक देशपांडे यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेण्यासाठी गडकरी शहरात आले होते. यावेळी माजी आ. श्रीकांत जोशी, शहराध्यक्ष शिरीष बोराळकर, प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर यांची उपस्थिती होती.
गडकरी म्हणाले, महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळाकडे हा रस्ता हस्तांतरित करण्यात येणार आहे. ३ हजार कोटींचे कर्ज हुडकोकडून उपलब्ध होणार आहे. दोन दिवसांत निर्णयाची प्रत मुंबई व क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविण्यात येणार आहे. लोकमतने २४ फेब्रुवारीच्या अंकात या महामार्गाच्या मंजुरीस विलंब होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील सात, तर पैठण तालुक्यातील १७ गावांतून मार्ग जाणार आहे. भारतमाला टप्पा - दोनमध्ये ग्रीन फिल्डमध्ये हा मार्ग होत आहे.
डॉ. कराड यांनी घेतली होती भेट...केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड यांनी या मार्गासाठी गेल्या आठवड्यात गडकरी यांची भेट घेऊन निर्णय घेण्याची मागणी केली होती. डॉ.कराड यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले, हा मार्ग बांधण्यासाठी गडकरी यांची भेट घेतली होती. लवकरच याबाबत वेगाने कार्यवाही सुरू होईल.
नागपूर ते पुणे साडेचार तासांतछत्रपती संभाजीनगर ते पुणे हे २२५ किमी अंतर दोन ते सव्वादोन तासात पूर्ण करता येईल. असा हा नवीन मार्ग असेल. त्यासाठी अलायमेंट अंतिम झाले आहे. छत्रपती संभाजीनगर ते शिरूरपर्यंत चार टोलनाके असतील. टोलच्या उत्पन्नातून विद्यमान छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर ते पुणे हा रस्ता चांगला करण्यात येणार आहे. नागपूर ते जालना समृद्धीमार्ग व पुढे छत्रपती संभाजीनगर ते पुणे नवीन महामार्गावरून साडेचार तासांत प्रवास होणे शक्य होईल.-नितीन गडकरी, केंद्रीय दळणवळण मंत्री