लोकमत न्यूज नेटवर्ककळमनुरी : येथील तहसील कार्यालयात निराधारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी समितीची बैठक १८ एप्रिल रोजी झाली. समितीने ४७१ निराधारांचे प्रस्ताव मंजूर केले आहेत. समिती सदस्यांच्या इतिवृतावर स्वाक्षऱ्या नसल्याने तहसील कार्यालयाने मंजूर प्रस्तावांच्या याद्या लावल्या नाहीत. निराधारांचे आलेले अर्ज मंजुरीसाठी समितीची बैठक १८ एप्रिल रोजी घेण्यात आली. यात संजय गांधीचे १२५, श्रावणबाळ व वृद्धापकाळ योजनेचे ३४६ असे एकूण ४७१ प्रस्ताव मंजूर केलेले आहेत. निराधारांचे प्रस्ताव मंजुरीसाठी १४०० प्रस्ताव तहसील कार्यालयात दाखल करण्यात आले होते. विविध कारणास्तव समितीने ९२९ प्रस्ताव नामंजूर केलेले आहेत. तर ४७१ प्रस्ताव मंजूर केले आहेत. परंतु समितीच्या सदस्यांनी इतिवृत्तावर स्वाक्षऱ्या केल्या नसल्याने अर्ज मंजूर झालेल्या निराधारांची नावे फलकावर प्रसिद्ध करण्यात आली नाहीत. त्यामुळे निराधारांचे अर्ज मंजूर होवूनही त्यांना मानधन मिळत नाही. निराधार तहसील कार्यालयाच्या चकरा मारत आहेत. इतिवृत्तावर सदस्यांनी स्वाक्षऱ्या कराव्यात, यासाठी तहसीलदारांनी सदस्यांना लेखी कळविले आहे. मंजूर लाभार्थ्यांची याद्या फलकावर लावून त्यांना तत्काळ मानधन द्या, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे यांच्याकडे वारंवार मागणी केली जात आहे. येत्या एक ते दोन दिवसांत निराधार समितीच्या सदस्यांच्या स्वाक्षऱ्या झाल्यानंतर याद्या लावण्यात येतील, असे आश्वासन तहसीलदारांनी दिले.
मंजूर याद्याच प्रसिद्ध होईनात
By admin | Published: June 29, 2017 12:15 AM