औरंगाबाद : रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे ( Raosaheb Danave ) यांनी जालन्याला पीटलाइन करण्याची घोषणा २ जानेवारी रोजी केली. मात्र, त्यापूर्वीच औरंगाबादेतील चिकलठाणा रेल्वेस्टेशनवर पीटलाइन टाकण्याचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव ( Ashwini Vaishanav ) यांनी मंजूर केल्याचे समोर आले आहे. केंद्रीय रेल्वेमंत्र्यांनी औरंगाबादेत मंजूर केलेली पीटलाइन ( Aurangabad Railway Pitline ) रेल्वे राज्यमंत्र्यांनी जालन्याला पळविण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आता केला जात आहे. असे असले तरी, ही पीटलाइन नेमकी कोठे होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे.
खा. डॉ. फौजिया खान यांनी रेल्वे मंत्रालयास लिहिलेल्या पत्राला केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दि.२८ डिसेंबर २०२१ रोजी दिलेल्या लेखी उत्तरात ही बाब स्पष्ट झाली. दि. २८ डिसेंबरपर्यंत औरंगाबादेतील चिकलठाणा येथे पीटलाइन मंजूर होती. अवघ्या ६ दिवसांत औरंगाबादची पीटलाइन जालन्याला वळविल्याचे दिसते आहे. मंत्री अश्विनी वैष्णव यांनी खा. डाॅ. फौजिया खान यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सध्या औरंगाबाद आणि लातूर येथे पीटलाइनची आवश्यकता नाही. नांदेड व पूर्णेत रेल्वे बोगीच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सुविधा आहे. त्या या परिसरातील रेल्वे समस्यासाठी पुरेशा आहेत. भविष्यातील गरज लक्षात घेता औरंगाबादपासून १० कि.मी. अंतरावरील चिकलठाण्यात पीटलाइन निर्मितीच्या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी दिली आहे. फौजिया खान यांनी शुक्रवारी हे पत्र ट्विट केले. औरंगाबादेत अनेक वर्षांपासून पीटलाइनची मागणी आहे. चिकलठाण्यात पीटलाइन तयार करण्यासाठी डीपीआर तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले होते. असे असतानाही अवघ्या ६ दिवसांत पीटलाइन जालन्याला वळविण्याचा निर्णय कसा काय झाला, पीटलाइन नेमकी कुठे होणार, जालना की औरंगाबाद असा सवाल रेल्वे संघटनांकडून उपस्थित केला जात आहे.
काय घडले नेमके ?-२८ डिसेंबर रोजी केंद्रीय रेल्वेमंत्र्यांचे चिकलठाण्यात पीटलाइन मंजूर असल्याचे पत्र.- २ जानेवारी रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची जालन्यात पीटलाइनची घोषणा.- २ जानेवारी रोजी औरंगाबादेतही पीटलाइनची मागणी करू, अशी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डाॅ. भागवत कराड यांची भूमिका.- ७ जानेवारी रोजी खा. फौजिया खान यांचे ट्विट. चिकलठाण्यात पीटलाइन मंजूर केल्याची दिली माहिती.