औरंगाबाद : जुन्या शहराला पाणीपुरवठा करणारी ७०० मि.मी. व्यासाची जलवाहिनी शुक्रवारी मध्यरात्री इसारवाडी येथे फुटली. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तब्बल २४ तास परिश्रम घेऊन जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण केले. रविवारी पहाटे ५ वाजता शहरात पाणी आणण्याचे काम सुरू झाले. शनिवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही त्या वसाहतींना रविवारी पाणी देण्यात येत होते.
शुक्रवारी आणि शनिवारी शहरात फक्त १४०० मि.मी. व्यासाच्या जलवाहिनीतून पाणी येत होते. शहराला ४० ते ४५, सिडको हडको भागाला किमान ४० एमएलडी पाणी मिळत होते. त्यात पाणीपुरवठा करणे अशक्य होत होते. जुन्या शहरात पाणीपुरवठा झाला नाही. शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण झाले. त्यानंतर जलवाहिनीची टेस्टिंग सुरू झाली. जायकवाडीपासून नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणण्यासाठी पहाटे ५ वाजले. त्यानंतर जुन्या शहरात पाणी येण्यास सुरुवात झाली. दुपारपर्यंत टाक्या भरण्याचे काम सुरू होते. शनिवारी ज्या वसाहतींना पाणी देता आले नाही त्या वसाहतींना प्राधान्याने पाणी देण्यास सुरुवात करण्यात आली. रविवारी ज्या वसाहतींना पाणी देण्याचा दिवस होता त्यांना पाणी देता आले नाही. संबंधित वसाहतींना सोमवारी पाणी देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रभारी कार्यकारी अभियंता किरण धांडे यांनी दिली. पुढील तीन ते चार दिवस काही वसाहतींना कमी दाबाने पाणी येईल, काही ठिकाणी पाण्याचा गॅप पडू शकतो. त्यामुळे संपूर्ण पाणीपुरवठा एक दिवस पुढे ढकलण्याचा विचार सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
नागरिकांची पाण्यासाठी भटकंती
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रशासनाने शनिवारी आणि रविवारी लॉकडाऊन जाहीर केले. त्यामुळे नागरिक घरातच थांबून होते. पाण्याची मागणी वाढलेली असताना शनिवारी आणि रविवारी अनेक वसाहतींना पाणीपुरवठा झाला नाही. त्यामुळे रविवारी शहरातील प्रमुख रस्त्यांवर महिला, आबालवृद्ध पाण्यासाठी भटकंती करताना दिसून आले.