गंगापूर : महाराष्ट्र बँकेच्या येथील शाखेत कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला ग्राहक वैतागले आहेत. ग्राहकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे व्यवस्थित न देता अरेरावी करत ग्राहकांना अपमानास्पद वागणूक देत असल्याचा प्रकार येथील शाखेत होऊ लागला आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱ्यांना झोनल कार्यालयाकडून समज देण्याची मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.
लहान कामांसाठीही कर्मचारी विलंब करतात. एका दिवसांत होणाऱ्या कामांसाठी अनेकदा हेलपाटे मारावे लागतात. त्यातही तासनतास ताटकळत बसल्यानंतर संबंधित अधिकारी इंटरनेट कनेक्टिव्हिटी अन् सर्व्हर डाऊन असल्याचे व कर्मचारी नसल्याचे कारण देत वेळ मारून नेतात. याबाबत जाब विचारणाऱ्याचे काम करण्यास हेतूपुरस्सर उशिरा करण्याचा प्रकार बॅंकेत होत असल्याने खातेधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
शेतीकर्जासाठी दत्तक गावातील शेतकऱ्यांना चुकीचे कारण देत कर्ज प्रकरण नाकारणे, पासबुकवर प्रिंट देण्यास टाळाटाळ करणे अशा तक्रारी बँकेचे खातेदार असलेले शेतकरी, व्यावसायिक, उद्योजक करीत आहेत. बँकेच्या या गलथान कारभारामुळे अनेक ग्राहकांना मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. यामध्ये सुधारणा न झाल्यास आम्ही आमचे खाते बंद करून शाखेस टाळे लावण्यासाठी भाग पाडू असा इशारा ग्राहक देत आहेत.
----
बॅंकेत कोणतीही माहिती रिससर मिळत नसून विलंबाने होणाऱ्या कामाबद्दल जाब विचारल्यास व्यवस्थापकाकडून उडवाउडवीची उत्तरे मिळतात. जाब विचारला म्हणून बँकिंग कामांसाठी हेतूपुरस्सर ताटकळत ठेवले जाते.
- मनोज गायकवाड, तक्रारदार, खातेधारक