औरंगाबाद : महापालिकेकडून पाणीपुरवठा होत नसलेल्या वसाहतींसह प्रत्येक व्यापाऱ्याकडे दुकानात पाण्याच्या जारचा वापर सुरू आहे. नेमके हे पाणी आहे तरी कुठले, याची साधी चौकशीही कोणी करीत नाही. नागरिकांना अवघ्या २० रुपयांमध्ये मिळणारे जारचे पाणी विहिरीचे आहे का विंधन विहिरीचे, हेसुद्धा शासकीय यंत्रणा तपासायला तयार नाही.
शहरात पाणी विक्रीचा व्यवसाय हळूहळू मोठ्या प्रमाणात वाढतोय. प्रत्येक वसाहतीमध्ये किमान एका ठिकाणी तरी जारची विक्री होते. बहुतांश विक्रेते विंधन विहिरीच्या पाण्याचा वापर करतात. ग्राहक संख्या जास्त आहे, तेथे विहिरीच्या पाण्याचा वापर केला जातो. मात्र, हे पाणी पिण्यासाठी योग्य आहे किंवा नाही, याची तपासणी अनेकजण प्रयोगशाळेमार्फत करीत नाहीत. पाणी शुद्ध करून विकणे हा एकमेव उपक्रम त्यांचा सध्या सुरू आहे.
पाण्यावर कमवतात पाण्यासारखा पैसा...शहरात पाण्याची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. महापालिकेकडे जास्तीचे पाणी नाही. त्यामुळे पाण्याचा व्यवसाय करणाऱ्या मंडळींचे फावते. शहराच्या आसपास तयार होणाऱ्या नवीन वसाहती, व्यावसायिक अशा मंडळींनाच जार चालक पाणी विकतात. या व्यवसायात दररोज लाखो रुपयांची उलाढाल होत आहे.
‘लोकमत’ने काय पाहिले?१) मुकुंदवाडी, गणेश कॉलनी, सिडको- एन-७, जटवाडा रोड आदी भागात विंधन विहिरीचे पाणी थेट जारमध्ये भरून विकायला नेण्यात येते. कुठेही पाणी शुद्ध करण्याची यंत्रणा नाही.२) चिकलठाणा, गुलमंडी आदी भागात काही मंडळी सामाजिक दायित्व म्हणून ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर पाण्याची विक्री करतात.
एक जार २० रुपयांना२० लिटरचा एक जार २० रुपयांना देण्यात येतो. व्यापाऱ्यांना दुकानावर दररोज एक किंवा त्यापेक्षा जास्त जार दिले जातात. अनेक वसाहतींमध्ये जार घरपोच दिले जातात. अनेक नागरिक स्वत: दुकानांवरून हे पाणी घरी नेतात.
जार व्यवसायावर नियंत्रण कोणाचे?अन्न व औषध प्रशासनाने पाण्याची गुणवत्ता तपासली पाहिजे. मात्र, या विभागाकडून आजपर्यंत दुर्लक्ष करण्यात आले. नियम धाब्यावर बसवून पाण्याची विक्री सुरू असल्याबद्दल एकाही जार चालकावर कारवाई झालेले नाही.
या पाण्याची कधी तपासणी होते का?महापालिका पाणीपुरवठा करण्यासाठी किमान चार ते पाच ठिकाणी पाण्याची तपासणी करते. खासगी जार चालक अजिबात तपासणी करीत नाहीत. संबंधित यंत्रणाही गांभीर्याने लक्ष देत नाही.