छत्रपती संभाजीनगर : पहाटे जेवण्यासाठी शहराबाहेर गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअर तरुणाचा मालक समजून टोळक्याने भोसकून खून केला. ही धक्कादायक घटना झाल्टा फाटा येथील यशवंत हॉटेलमध्ये शुक्रवारी पहाटे तीन ते साडेतीनच्या सुमारास घडली. याप्रकरणी चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवल्याची माहिती पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांनी दिली.
संतोष राजू पेड्डी (२८, रा. राजज्योती बिल्डिंग, उस्मानपुरा) असे मृत तरुणाचे नाव आहे. चिकलठाणा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष एका कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनिअर होते. ते रात्री उशिरापर्यंत वर्क फ्रॉम होम करत. पेड्डी कुटुंबाचा रोपळेकर हॉस्पिटल परिसरात डेअरीचा व्यवसाय आहे. त्यांचे कुटुंबीय लग्नानिमित्त हैदराबादला गेले होते. त्यामुळे संतोष घरी एकटे होते. ऑफिसचे काम पहाटेपर्यंत चालले. पहाटे संतोषना भूक लागली. त्यामुळे त्यांनी जवळ राहणारे गाडीचालक राधेश्याम अशोक गडदे (मूळ रा. मंठा) यांना फोन करून बोलावून घेतले. त्यानंतर दोघे फॉर्च्युनर कारने (एमएच १२, एफवाय ४१९४) जेवणासाठी बीड बायपासमार्गे झाल्टा फाटा येथे गेले. यशवंत हॉटेलसमोर कार लावून आत घुसणार तेवढ्यात समोरून तिघांचे एक टोळके चाल करून आले. त्यांनी मालक समजून संतोषवरच हल्ला चढवला. त्यांनी मालक नसल्याचे सांगितले, तोपर्यंत टोळक्यातील एकाने संतोष यांच्या छातीत डाव्या बाजूला चाकू खुपसला. हा वार एवढा जोराचा होता की, थेट हृदयात घुसल्याने ते खाली कोसळले. चालकाने तत्काळ उचलून कारने त्यांना खासगी रुग्णालयात नेले. तेथील डॉक्टरांनी घाटी रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. घाटीतील डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. संतोष यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असा परिवार आहे.
वाद दुसऱ्यांचा; बळी गेला भलत्याचापोलिसांच्या माहितीनुसार झाल्टा फाटा येथे बद्री शिंदे यांचे यशवंत हॉटेल आहे. त्याठिकाणी अगोदरपासून तीन मित्र जेवायला गेले हाेते. जेवणानंतर तिघांनी शीतपेय घेतले. त्याचे पैसे हॉटेल व्यवस्थापकाने मागितले. तेव्हा तिघांना राग आला. त्यांनी चाकूचा धाक दाखवून हॉटेलमध्ये दहशत निर्माण केली. त्याचवेळी संतोष फॉर्च्युनरमधून उतरले. तेव्हा तिघांना वाटले की, हा हॉटेल मालक आहे. त्यामुळे तिघांनी संतोषवर हल्ला केला. त्यातच संतोषचा जीव गेला.
शांत अन् सर्वांना सहकार्य करणारासॉफ्टवेअर इंजिनिअर संतोष अतिशय शांत स्वभावाचे होते. मित्रपरिवारासह कुटुंबातही सर्वांना सहकार्य करणारे होते, अशी माहिती त्यांच्या काकांनी दिली. दरम्यान, संतोषचे आईवडील हैदराबादहून शहरात परतले असून, शनिवारी सकाळी प्रतापनगर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत.
चिकलठाणा पोलिसांच्या दोघे ताब्यातचिकलठाणा पोलिसांनी संतोष खून प्रकरणात शहराबाहेरून दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या संशयितांची चौकशी केल्यानंतर खुनाच्या घटनेचा आणखी उलगडा होण्याची शक्यता आहे. या प्रकरणी चिकलठाणा पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस निरीक्षक रवीकिरण दरवडे यांच्या मार्गदर्शनात सहायक निरीक्षक समाधान पवार अधिक तपास करीत आहेत.
चार दिवसांत तीन खूनशहराच्या परिसरात चार दिवसांमध्ये तीन खुनाच्या घटना उघडकीस आल्या आहेत.-हर्सूल कारागृहाच्या समोरील मैदानात दिनेश ऊर्फ बबलू परमानंद मोरे (रा. चेतनानगर, हर्सूल) या तरुणाचा चार-पाच जणांच्या टोळक्याने चाकूने भोसकून २ डिसेंबर रोजी दुपारी खून केला.- मिसरवाडीतील सनी सेंटरच्या पाठीमागच्या मैदानावर विकास ज्ञानदेव खळगे (रा. मिसारवाडी) या तरुणाचा पाच जणांच्या टोळक्याने चाकू, तलवार आणि कुऱ्हाडीचे घाव घालून गुरुवारी रात्री खून केला.- सॉफ्टवेअर इंजिनिअरला संतोष राजू पेड्डी (रा. उस्मानपुरा) या तरुणाचा झाल्टा फाटा येथील एका हॉटेलमध्ये तीन जणांच्या टोळक्याने चाकू खुपसून ६ डिसेंबरच्या पहाटे खून केला.