लोकमत न्यूज नेटवर्कबीड : तालुक्यातील नेकनूर येथे डॉ. विलास झुंबरलाल कोठारी यांच्या घरात सोमवारी पहाटे दरोडेखोरांनी धुमाकूळ घातला. दरोडेखोरांनी केलेल्या सशस्त्र हल्ल्यात कोठारी दाम्पत्य जखमी झाले. नेकनूर येथे मुख्य रस्त्यावर कोठारी यांचे घर आहे. पहाटे दोन वाजता मागील बाजूचा दरवाजा उचकटून सहा दरोडेखोर त्यांच्या घरात शिरले. कपाट असलेल्या खोलीत दरोडेखोरांनी उचकाउचक सुरु केली. यावेळी शेजारच्या खोलीत झोपलेल्या डॉ. विलास कोठारी व त्यांच्या पत्नी उज्वला यांना जाग आली. त्यांनी दरोडेखोरांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यांना शस्त्राचा धाक दाखविला. त्यानंतर लोखंडी गजाने कोठारी दाम्पत्य व त्यांचा मुलगा योगेश यांना मारहाण केली. यात तिघेही जखमी झाले. त्यांनी आरडाओरड सुरु केली. यावेळी दरोडेखोरांनी फोनचे वायर तोडले. शिवाय कोठारी यांचे दोन मोबाईल हिसकावून काढता पाय घेतला. या घटनेनंतर डॉ. कोठारी यांनी शेजाऱ्यांना आवाज दिला. नेकनूर पोलिसांनी तातडीने धाव घेतली; परंतु तोपर्यंत दरोडेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी जखमी डॉक्टर दाम्पत्यास उपचारकामी ग्रामीण रुग्णालयात हलविले. याप्रकरणी डॉ. विलास कोठारी यांच्या फिर्यादीवरुन गुन्हा नोंद झाला आहे. घटनास्थळी गुन्हे शाखा, दरोडा प्रतिबंधक पथकाच्या अधिकाऱ्यांनी भेट दिली. ठसे तज्ज्ञही पाचारण केले होते. या घटनेने नेकनूर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सशस्त्र दरोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2017 12:50 AM