अवैध गौण खनिजाचे उत्खनन रोखण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडते. चोरटी वाहतूक करणाऱ्यांना प्रशासनाचा कोणताही धाक उरला नसून याविरोधात कारवाईसाठी गेलेल्या अनेक अधिकाऱ्यांच्या अंगावर वाहने घालून त्यांना जिवे मारण्याचे प्रयत्न होत असल्याच्या काही घटना घडल्या आहेत. त्यामुळे अनेक अधिकारी इच्छा असूनही भीतीपोटी कारवाईसाठी धजावत नाहीत. परिणामी वाळू व मुरमाची चोरटी वाहतूक दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र आहे. यास आळा घालण्याच्या दृष्टीने शासनाने अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी उपाययोजनांतर्गत वाळूसाठ्यांचे रक्षण करणे आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या संरक्षणासाठी जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलसाठी स्वतःचे शस्त्र बाळगण्याचा परवाना असलेला एक सेवानिवृत्त सैनिक नेमण्याचे आदेश दिले आहेत. बंदूकधारी सुरक्षा रक्षक मिळणार असल्याने गौण खनिजाची चोरटी वाहतूक करणाऱ्यांविरोधात कारवाईसाठी मनोबल वाढेल असे नायब तहसीलदार अविनाश अंकुश यांनी स्पष्ट केले.
गौण खनिजाच्या रक्षणासाठी मिळणार सशस्त्र सुरक्षा रक्षक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 4:05 AM