लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : महाराष्ट्र शासनाने शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी १०० कोटींचा निधी मंजूर केला. हा निधी फक्त आणि फक्त भाजपनेच आणला, असा अपप्रचार स्थानिक नेत्यांकडून सुरू झाला. सर्वसाधारण सभेतही महापौरांचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे चिडलेल्या सेना नगरसेवकांनी मागील सर्वसाधारण सभेवर बहिष्कार घातला होता. गुरुवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपूर्वी महापौर बापू घडामोडे यांनी नमते घेत सेना नगरसेवकांना आपल्या कक्षात चहापानाचे निमंत्रण दिले. सेनेने हे निमंत्रण स्वीकारून १०० कोटींचा निधी सर्वपक्षीय नेत्यांनी आणला, असा अभिनंदनाचा ठराव सभेत मंजूर करून घेतला.शिवसेनेने १०० कोटींच्या मुद्यावरून भाजपला कोंडीत पकडले होते. त्यापाठोपाठ एमआयएमने चीन दौऱ्याच्या निमित्ताने महापौरांची कोंडी केली होती. या गोष्टीचा वचपा काढण्यासाठी गुरुवारी महापौरांनी एमआयएम नगरसेवकांचा एकही ठराव विषयपत्रिकेत घेतला नाही. त्यामुळे एमआयएम नगरसेवकांचा एकच जळफळाट झाला. त्यांनी महापौरांच्या आसनासमोर धाव घेऊन जाब विचारण्याचा प्रयत्न केला. सूचक, अनुमोदक नसल्याने नियमानुसार ठराव घेतला नसल्याचा खुलासा महापौरांनी केला. एमआयएम एकाकी पडल्यानंतर १०० कोटींच्या रस्त्यांचा मुद्दा उपस्थित झाला.मागील वेळी सेनेचा गैरसमज झाला. आम्ही हा निधी आणण्यासाठी भाजपसह इतर पक्ष म्हणजेच सेना, एमआयएम आदींचा उल्लेख करणार होतो. त्यापूर्वीच तुम्ही सभागृह सोडले, असा टोला राजू शिंदे यांनी मारला. ‘सोन्या आमच्यावर भरोसा नाय काय...’अशी कोपरखळीही शिंदे यांनी सेना नगरसेवकांना मारली. शेवटी महापौर बापू घडामोडे यांनी नमते घेऊन १०० कोटींसाठी तत्कालीन महापौर त्र्यंबक तुपे तसेच शिवसेनेचे सर्व आमदार, खासदार आणि एमआयएमच्या आमदारांनीही प्रयत्न केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मंजूर केला.
सेना-भाजपची दिलजमाई; एमआयएम एकाकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 1:12 AM