औरंगाबाद : भारत देश निर्यातदार नव्हे, तर आयातदार राहावा, या हेतूने विदेशी ताकद सतत प्रयत्नशील आहे. म्हणूनच तर अमेरिकेतील लष्करी अळी आफ्रिकेनंतर आता भारतातील मक्यासह अन्य ७० पीक उद्ध्वस्त करण्यासाठी आली आहे. आता शत्रू राष्ट्रावर बॉम्बहल्ला करण्याची गरज नाही, पिकात एक ते दोन अळ्या सोडल्या तरी लाखो हेक्टरवरील पीक खाऊन टाकते. शेतकऱ्याचेच नव्हे, तर देशाचे मोठे आर्थिक नुकसान यातून होऊ शकते. या अळीचा धोका औरंगाबादेत येऊन ठेपला आहे. शेतकऱ्यांनी नांगरणीपासून लक्ष दिले नाही तर लष्करी अळी मक्याचे मोठे नुकसान करू शकते, असा गंभीर इशारा नवी दिल्ली येथील कृषी शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी यांनी येथे दिला.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, साऊथ एशिया बायोटेक्नॉलॉजी सेंटर व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बुधवारी मक्यावरील लष्करी अळी नियंत्रण जागृती अभियानाला सुरुवात झाली. यानिमित्ताने मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण होते. प्रमुख पाहुणे चारुदत्त मायी यांनी आरोप केला की, सर्वप्रथम अमेरिकेत मक्यावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. त्यानंतर आफ्रिकेमध्येही लष्करी अळीने लाखो हेक्टर जमिनीवरील मका नष्ट केला. एकवेळ अशी होती की, भारत मक्याचा मोठा आयातदार होता; पण मागील काही वर्षांत परिस्थिती बदलली व भारत आता मोठा निर्यातदार बनला आहे. याचा फटका अमेरिकेसह अन्य देशांना बसत आहे.
आपला देश सशक्त झाल्यामुळे जगातील बलाढ्य शक्तीचे नुकसान होत आहे. भारत नेहमी आयातदारच राहावा, असा या देशांचा डाव आहे. अमेरिकेत आढळलेली लष्करी अळी भारतात कशी आली, हेच यामागील कारण असल्याचे त्यांनी नमूद केले. औरंगाबादेत १ लाख ८५ हजार हेक्टरवर मक्याचे पीक घेतले जाते. जालना मिळून ३ लाख हेक्टरवर मक्याची पेरणी होणार आहे. मिझोराम, कर्नाटक, तामिळनाडू येथे लष्करी अळीने मक्याचे मोठे नुकसान केले आहे. यंदा औरंगाबाद व जालन्यात मक्यावर लष्करी अळी हल्ला करण्याच्या तयारीत आहे. यासाठी नांगरणीपासून शेतकऱ्यांनी सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी कृषी विद्यापीठाचे संचालक संशोधक डी.पी. वासकर, संचालक विस्तार पी.जी. इंगोले, भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे माजी संचालक सैन दास, शास्त्रज्ञ भगीरथ चौधरी, डॉ. जी.टी. गुजर आदींनी लष्करी अळीचा नायनाट कसा करायचा, याची माहिती दिली. एस.डी. पवार यांनी आभार मानले.
शांतीच्या वेळी घाम गाळा, युद्धात रक्त सांडण्याची गरज नाही वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अशोक ढवण यांनी सांगितले की, गुलाबी बोंडअळीने सर्व कपाशी नष्ट केली होती, तसेच यंदा मक्यावर लष्करी अळीच्या प्रादुर्भावाचा धोका जाणवत आहे. खोलगट नांगरणीपासून अळीरूपी शत्रू नष्ट करण्यासाठी आयुधे हाती घ्या. कारण, आता शांतीची वेळ आहे.या काळात घाम गाळा, तर प्रत्यक्ष युद्धात रक्त सांडण्याची गरज नाही. शेतकऱ्यांनी लष्करी अळीचा जीवनक्रम समजावून घ्यावा व शास्त्राने सुचविलेल्या उपाययोजनांद्वारे मर्मावरच घाव घालावा, जेणेकरून वेळीच लष्करी अळीला रोखता येईल.