औरंगाबाद : ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस कॉलनी आणि परिसरातील सुमारे शंभर झाडे सोमवारी सायंकाळी वादळी पावसात जमीनदोस्त झाली. यात काही झाडे वाहनांवर पडल्याने अनेक वाहनांचे नुकसान झाले, तर मुख्य रस्त्यालगतच्या वीज वाहिनीवर झाड पडल्याने दोन खांब वाकले आणि तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला.औरंगाबाद शहरात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी सायंकाळी वादळी वाºयासह पावसाने हजेरी लावली. सुमारे पंधरा ते वीस मिनिटे झालेल्या या पावसाने मात्र हडको टीव्ही सेंटर परिसरातील ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय आणि पोलीस कॉलनी परिसरात दाणादाण उडविली. पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या कमानीवरील नावाचा अर्धा फलक तुटून पडला. कार्यालयाच्या आवारात अनेक वर्षांपासून अथक प्रयत्न करून जगविलेली विविध प्रकारची झाडे वादळात मुळांसह उन्मळून पडली. अधीक्षक कार्यालयाच्या आवारातील झाड रस्त्याशेजारील ११ केव्ही वीज वाहिनीवर पडल्याने दोन खांब आडवे झाले आणि तारा तुटल्याने परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. पोलीस मुख्यालयाच्या वाहन पार्किंगलगतचे झाड रस्त्यावर पडले. एटीएस कार्यालयाच्या आवारातील एक झाड एका कारवर पडले. यात कारचे नुकसान झाले. कर्मचाऱ्यांनी हे झाड बाजूला केले. ग्रामीण पोलीस दलाच्या कैलासशिल्प या सांस्कृतिक सभागृहाजवळील निलगिरीचे मोठे झाड पडले. पोलीस कॉलनीतील सुमारे वीस वर्षे जुने वडाचे झाड मुळासह उन्मळून पडले. वटपौर्णिमेच्या दिवशी पोलीस कुटुंबियांतील महिला या वडाच्या झाडाची पूजा करीत. हे झाड कोसळल्याने महिलांना आता १६ जून रोजी होणाºया वटपौर्णिमेच्या पूजेसाठी नवीन झाडाचा शोध घ्यावा लागेल. याच परिसरातील एक झाड तारेवर पडले, तर अन्य जांभळाचे झाड आजच्या वादळात आडवे झाले. याशिवाय गोकुळ क्रीडा मैदानालगतचे बाभळीचे मोठे झाड पडले.शहरातील सुमारे पन्नास ठिकाणी पडली झाडेसोमवारच्या वादळी पावसात शहरातील सुमारे पन्नासहून अधिक ठिकाणी झाडे पडल्याची माहिती समोर आली. यापैकी विविध ४० ठिकाणाहून झाडे पडल्याने मदतीसाठी अग्निशामक दलाला मदतीसाठी बोलविण्यात आले. यात सिडको एन-९, ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय परिसर, पोलीस कॉलनी, विभागीय आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ, सिडको कॅनॉट मार्केट, एमजीएम परिसर, नागेश्वरवाडीतील एचडीएफसी बँकेजवळ, मनपा मुख्य इमारतीजवळ, सिडकोतील बळीराम पाटील शाळेजवळ, विशेष पोलीस महानिरीक्षक कार्यालय परिसर, जनता बाजार, औरंगपुरा, गुलमंडी, फाजलपुरा, शिवशंकर कॉलनी, सिडको एन-५, हेडगेवार रुग्णालय परिसर, गारखेड्यातील मेहरनगर आदी ठिकाणी मदतीसाठी अग्निशमन दलाचे जवान गेल्याची माहिती मिळाली.
पोलीस अधीक्षक कार्यालय आणि परिसरात सुमारे शंभर वृक्ष जमीनदोस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 11:50 PM