वाळूज महानगर : रोजगाराच्या शोधात मुंबईहून वाळूज एमआयडीसीत आलेल्या एका भामट्याला घरात आश्रय देणे एकास चांगलेच महागात पडले आहे. नात्याने मावस भाऊ असलेल्या या भामट्याने ८० हजारांचा गंडा घातल्याची घटना साजापुरात उघडकीस आली आहे.
महादेव सोनटक्के (रा.लिंगपासा काºहाळा ता.परतूर जि.जालना) हा काही दिवसांपूर्वी मुंबईत कामासाठी गेला होता. मुंबईत काम मिळत नसल्यामुळे महादेव रोजगाराच्या शोधात तीन महिन्यांपूर्वी १० सप्टेंबरला वाळूज एमआयडीसीत आला होता. या परिसरातील साजापुरात महादेवचा मावस भाऊ दत्ता नरहरी पतंगे हा वास्तव्यास असल्याने महादेवने त्याच्याकडे आश्रय घेतला होता. महादेव बेरोजगार असल्यामुळे दत्ताने त्यास वाळूज एमआयडीसीतील एका कंपनीत काम मिळवून दिले होते. दत्ता पतंगे याला पैशाची गरज असल्यामुळे त्याने त्याचा मित्र गजाजन कोळी याला एक लाख रुपये उसणे मागितले होते.
कोळीने पैसे देण्याची तयारी दर्शविल्यामुळे १४ सप्टेंबरला दत्ता महादेवसोबत बजाजनगरातील एका बँकेत गेला. या बँकेतून पैसे काढल्यानंतर गजानन कोळी दत्ताला एक लाख रुपये देऊन तो घरी निघून गेला. पैसे मिळाल्यानंतर दत्ताने महादेवला सोबत घेऊन आपण गाडीचा हप्ता भरुन येऊ, असे म्हणून दोघेही शहरात गेले होते. शहरातील फायनान्स कंपनीचा ११ हजारांचा हप्ता भरल्यानंतर दत्ताने मुळगावी राहणाऱ्या भाऊ प्रल्हाद यास १० हजार रुपये पाठवून दिले होते. उर्वरित ७९ हजार व पाकीटातील १ हजार असे ८० हजार रुपये पॅन्टच्या खिशात टाकुन दत्ता व महादेव रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घरी गेले होते. रात्री दत्ताने पत्नी आरती व महादेव अशा तिघांनी सोबत जेवण करुन रात्री ११ वाजेच्या सुमारास घरी झोपले.
दुसºया दिवशी १५ सप्टेंबरला दत्ता झोपेतून उठल्यावर महादेव घरात दिसून आला नाही. त्यामुळे दत्ताने आरतीकडे विचारपूस केल. तिने महादेव हा मित्राला फोनवर बोलून येतो, असे म्हणून घराबाहेर गेल्याचे सांगितले. दरम्यान, शेजाºयाचे पैसे द्यायचे असल्यामुळे दत्ताने पॅन्टच्या खिशाची तपासणी केली असता त्यास ८० हजार रुपये गायब असल्याचे दिसून आले.
महादेव याने पैसे चोरल्याचा संशय आल्याने दत्ताने त्याच्याशी संपर्क केला असता मीच पैसे चोरले असल्याची कबुली महादेवने दिली. तुम्ही पोलिसात तक्रार करु नका, मी पैसे परत देतो, अशी थाप त्याने मारली होती. मात्र, पैसे परत मिळत नसल्यामुळे दत्ता पतंगे याने एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात ८० हजार रुपये लांबविणाºया महादेव सोनटक्के याच्या विरोधात तक्रार दिली आहे. या प्रकरणी महादेव सोनटक्केविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.