औरंगाबाद : महापालिकेने हर्सूल तलावातील गाळ काढण्यास सुरुवात केली आहे. मागील सहा दिवसांमध्ये ४ हजार ६३४ क्युबिक मीटर गाळ काढण्यात आल्याचा दावा कंत्राटदारासह मनपाकडून करण्यात येत आहे. तलावातील गाळ काढणे आणि तो नेऊन टाकण्यासाठी मनपा कोट्यवधी रुपये खर्च करीत आहे. पंचक्रोशीतील शेतकरी स्वत:हून आपल्या वाहनातून गाळ नेत आहेत, हे विशेष.गुरुवार ५ मेपासून हर्सूल तलावातून गाळ काढण्यात येत आहे. शासनाने महापालिकेला गाळ काढण्यासाठी २ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. मनपाने एका कंत्राटदाराला गाळ काढण्याचे टेंडर दिले आहे. सुरुवातीला अत्यंत संथगतीने गाळ काढण्याचे काम सुरू होते. विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांनी गाळ काढण्यासाठी यंत्रणा वाढवावी असे आदेश मनपाला दिले. त्यानंतर आठ मशिन्स वाढविण्यात आल्या. दोन जेसीबी आणि पाच पोकलेन, एका बुलडोझरच्या साह्याने गाळ काढण्यात येत आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या वाहनांमधून १४८७ ट्रीप गाळ काढण्यात येत असल्याचा दावा करण्यात येत आहे. सकाळी साडेसात वाजेपासून सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत गाळ काढण्याचे काम सुरूआहे. कंत्राटदाराने गाळ काढून तो दुसरीकडे नेऊन टाकण्यासाठी मनपा पैसे देत आहे. सर्वसामान्य शेतकरी आपल्या वाहनातून गाळ नेत असतील तर कंत्राटदार आपण गाळ काढून दुसरीकडे टाकला असा दावा करीत आहे. यामध्ये मनपाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागणार आहे, हे निश्चित. कंत्राटदाराने दोन कोटी रुपयांमध्ये किती गाळ काढला हेसुद्धा लवकरच लक्षात येणार आहे.
साडेचार हजार क्युबिक मीटर गाळ काढला
By admin | Published: May 13, 2016 12:16 AM