औरंगाबाद : महापालिकेने सुरु केलेल्या २१ कोविड केअर सेंटरपैकी १२ कोविड केअर सेंटर सुरू आहेत. त्यातील एका कोविड केअर सेंटरमध्ये फक्त एकच रुग्ण आहे. सर्व कोविड केअर सेंटर्सची रुग्ण क्षमता ३९३८ आहे. सध्या केवळ ८०० रुग्ण दाखल आहेत.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मार्च - एप्रिल महिन्यात रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ पाहण्यास मिळाली. एका दिवशी तर १९०० पेक्षा जास्त रुग्ण शहरात आढळले. त्यामुळे चिंता वाढली होती. रुग्ण संख्या कमी होण्यासाठी प्रशासनाने आवश्यक त्या उपाययोजना सुरु केल्या. शासनाने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत संचारबंदी पुकारली. त्याचा परिणाम म्हणून शहरातील कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होत आहे. पालिका क्षेत्रात मंगळवारी १७४ रुग्ण आढळले होते.
महापालिकेची शहरात सध्या १२ सीसीसी सुरू आहेत. त्यात शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, पीईएस अभियांत्रिकी महाविद्यालय, यशवंत हॉस्टेल विद्यापीठ परिसर, छत्रपती हॉस्टेल विद्यापीठ परिसर, देवगिरी मुलांचे हॉस्टेल, देवगिरी मुलींचे हॉस्टेल, विभागीय क्रीडा संकुल, शासकीय बी. एड. कॉलेज मुलांचे हॉस्टेल, शासकीय बी. एड. कॉलेज मुलींचे हॉस्टेल, शासकीय विज्ञान संस्थेचे हॉस्टेल, संत तुकाराम हॉस्टेल, श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज या कोविड केअर सेंटरचा समावेश आहे. एमआयटी कॉलेजच्या बॉईज हॉस्टेलमधील एका कोविड केअर सेंटरमध्ये फक्त एक रुग्ण दाखल असल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
रुग्ण दाखल असलेले कोविड केअर सेंटर व तेथील रुग्णांची संख्या
मेल्ट्रॉन - २६८
एमआयटी बॉईज होस्टेल - १
एमआयटी बॉईज होस्टेल - १७०
समाजकल्याण बॉईज होस्टेल, किलेअर्क - ४३
ईओसी, पदमपुरा - २३
सीएसएमएसएस, कांचनवाडी - ५६
शासकीय अभियांत्रिकी कॉलेजचे होस्टेल - ४१
सिपेट - १६०
रमाई होस्टेल, विद्यापीठ - १८
-