औरंगाबाद, दि. २४ : अनिवासी महिलेचा सिडको एन-४ मधील अलिशान बंगला परस्पर खरेदी करणा-या व्यापा-यास मुकुंदवाडी पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली. राजेश रामविलास बंग (४६, रा. सिडको एन-३) असे अटक केलेल्या व्यापा-याचे नाव आहे.
या प्रकरणात पोलिसांनी यापूर्वीच सुकेशिनी येरमे आणि राजेंद्र माटे यांना अटक केलेली असून, ते सध्या न्यायालयीन कोठडीत हर्सूल कारागृहात कैद आहेत. मुकुंदवाडी ठाण्याचे निरीक्षक शिवाजी कांबळे यांनी सांगितले की, सिडको एन-४ येथील डॉ. शिवाजी गुणाले आणि त्यांची पत्नी वत्सला गुणाले (सध्या रा.अमेरिका). त्यांच्या मालकीचा सिडकोतील एकमेव बंगला त्यांनी वत्सला यांची भाची सुकेशिनी येरमे हिला राहण्यासाठी दिला होता. त्यांची एक कार आणि एक दुचाकीही बंगल्यात होत्या. हे वाहन चालविण्यासाठी आणि सुकेशिनी हिला कॉलेजला नेऊन सोडणे, घरगुती कामात मदत करणे आदी कामांसाठी आरोपी राजेंद्र माटे यास नोकरीला ठेवले होते.
दरम्यान, आरोपी सुकेशिनी आणि राजेंद्र माटे यांनी संगनमत करून गुणाले दाम्पत्याचा बंगला आरोपी राजेश बंग नावाच्या किराणा दुकानदाराला परस्पर ६८ लाखाला विक्री केला. सुरुवातीला पोलिसांनी बंग यास बोलावले तेव्हा आपण रीतसर बंगला खरेदी केल्याचे पोलिसांना सांगत असे. त्यामुळे त्याला अटक करता आली नव्हती.
जीपीएमधील बनवेगिरी समोर येताच अटक
बंगला वत्सला गुणाले यांच्या मालकीचा असल्याचे आरोपी बंग याला माहिती होती. शिवाय घरगुती कामे करण्यासाठी गुणाले यांनी सुकेशिनी हीस जीपीए (जनरल पॉवर आॅफ अॅटर्नी) दिला होता. या जीपीएमध्ये मात्र कोणत्याही खरेदी- विक्रीचे अधिकार सुकेशिनीला दिले नव्हते. असे असताना आरोपींनी जीपीएमधील एका मुद्याच्या शेवटी सुकेशिनीला प्लॉट खरेदी-विक्रीचे अधिकार प्रदान केले, अशा आशयाचा अतिरिक्त मजकूर नव्याने टंकलिखित करण्यात आल्याचे पोलीस निरीक्षक कांबळे यांच्या नजरेतून सुटले नाही. कारण वरील सर्व मजकूर आणि अतिरिक्त टाईप केलेल्या मजकुराच्या आकारात बदल झालेला होता. आरोपींनी अत्यंत महत्त्वाचा हा मजकूर नंतर केव्हातरी जीपीएमध्ये टंकलिखित केल्याचे समोर येताच पोलिसांनी बंग यास अटक केली.
फर्निचरसह बंगल्याचा वापरसुकेशिनी आणि राजेंद्र हे बंगला सोडून जाताना त्यांनी बंगल्यातील फर्निचरही ए.सी.सोबत नेले नव्हते. त्यामुळे आजही हे सामान बंगल्यात जसेच्या तसे असल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी पंचनामा करून हे फर्निचर जप्त केले.