छत्रपती संभाजीनगर: शहरातील किराडपुरा येथे गुरुवारी पहाटे झालेल्या दगडफेक आणि जाळपोळ प्रकरणात तब्बल ५०० जणांवर दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आता पोलिसांनी अटक सत्र सुरु केले आहे. आज सकाळी सात संशयितांना शहरातील विविध भागातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
दोन गटातील क्षुल्लक वादातून दगडफेक आणि जाळपोळीची घटना शहरातील किराडपुरा भागात गुरुवारी पहाटे घडली. रामनवमीच्या पार्श्वभूमीवर अशी घटना घडल्याने पोलिसांनी तत्काळ कारवाई करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर मंत्री, लोकप्रतिनिधी, सनदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत सर्वांना शांततेचे आवाहन केले. दिवसभर रामनवमीचे कार्यक्रम उत्साहात पार पडले. दरम्यान, गुरुवारी दुपारी पोलिसांनी जिन्सी ठाण्यात अज्ञात ५०० जणांच्या विरोधात दंगल भडकविण्याचा गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेजवरून पोलिसांनी आरोपींची ओळख पटवत पुढील कारवाई सुरु केली.
आज सकाळी या प्रकरणी सात आरोपींना शहरातील विविध भागातून पोलिसांनी ताब्यात घेतले. सय्यद नूर सय्यद युसुफ (२७, रा. सिकंदर हॉलच्या मागे), बरकत शौकत शेख (23 रा. कटकटगेट), शेख अंतिक शेख हारून (24, रा.कटकटगेट), सदामशहा बिस्मिला शहा (33), शेख कादर शेख रशिद (25 रा. खासगेट), गरिख खान इरफान खान (23, रा राजाबाजार ), शेख सलीम शेख आगेज (25 रा. सेंदुराण) अशी ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.