रोहित भागीनाथ म्हस्के (२१, रा. जाधववाडी) याविषयी प्राप्त माहिती अशी की, शहरातील एका महाविद्यालयात पीडिता अकरावीत शिकत आहे. किरायाच्या घरात राहत असताना वर्षभरापूर्वी तिची आणि आरोपीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात रात्री ९ वाजता त्याने तिला फोन करून त्याच्या वाढदिवसानिमित्त त्याच्या काही मैत्रिणी येणार असल्याचे सांगून बोलावले. यामुळे ती त्याच्या घरी गेली असता तेथे ना त्याच्या मैत्रिणी होत्या ना त्याचे नातेवाईक. घरी एकटा असलेल्या रोहितला पाहून ती परत जाऊ लागली असता त्याने तिचा हात पकडून घरात नेले. तेथे तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. या घटनेची माहिती कुणालाही सांगू नको, असे तो तिला म्हणाला. या प्रकारानंतर त्याने तिला प्रेमाचे आणि लग्नाचे आमिष दाखवून २० ते २५ वेळा तिच्यावर अत्याचार केला. दोन महिन्यापासून तिचे मासिक ऋतुचक्र चुकल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले. यामुळे तिने विश्वासात घेऊन याविषयी पीडितेकडे विचारपूस केली असता आरोपी रोहितने केलेल्या अत्याचाराची माहिती तिने दिली. यानंतर तिला घेऊन तिची आईने थेट हर्सुल पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पीडितेची फिर्याद नोंदवून घेऊन पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला. पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कामे यांनी झटपट कारवाई करून आरोपी रोहितला अटक केली.
लग्नाच्या आमिषाने प्रेयसीवर अत्याचार करणारा प्रियकराला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2021 4:04 AM