औरंगाबाद: खेड्यापाड्यातील शेतकऱ्यांच्या गोठ्यातून जनावरे चोरणाऱ्या रेकार्डवरील चोरट्याला ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली. पळशी शिवारातून ५७ हजाराची जनावरे चोरून नेल्याची कबुली त्याने दिली असून गुन्हा करण्यासाठी वापरलेला टेम्पो ,मोबाईल आणि रोख रक्कम असा सुमारे २लाख ५१ हजार ६००रुपयांचा ऐवज पोलिसांनी हस्तगत केला.
शेख मुक्तार उर्फ कालू शेख चाँद (३०,रा. नायगाव)असे आरोपीचे नाव आहे. ग्रामीण पोलिसांनी सांगितले की, पळशी येथील रहिवासी कडूबा भागाजी शेळके यांच्या शेतातील गोठ्यातून २ जानेवारी रोजी बैलजोडी चोरट्यांनी पळविली होती. याविषयी शेळके यांनी चिकलठाणा ठाण्यात तक्रार नोंदविली होती. या गुन्ह्याचा तपासादरम्यान ही चोरी नायगाव येथील शेख मुक्तार उर्फ कालूने केल्याची माहिती खबऱ्याने गुन्हेशाखेला दिली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक भागवत फुंदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुल्हत, उपनिरीक्षक संदीप सोळंके, कर्मचारी झिया, विठ्ठल राख, विक्रम देशमुख, गणेश मुळे, संजय देवरे, नवनाथ कोल्हे, दिपेश नागझरे, अनिल चव्हाण, बाबासाहेब नवले, योगेश टरमाळे, जीवन घोलप आणि ज्ञानेश्वर मेटे यांनी संशयित आरोपी मुक्तार उर्फ कालूला पकडण्यासाठी १६ जानेवारी रोजी नायगाव येथील मोहंदरी गाठले.
पोलीस आल्याची चाहुल लागताच आरोपी पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करुन समृद्धी महामार्गालगत त्याला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले. पळशी शिवारातील बैलजोडीच्या चोरीविषयी त्याच्याकडे विचारपूस केली असता पोलिसांना तो उडवाउडवीची उत्तरे देत होता. पोलिसांनी त्याला खाक्या दाखविताच तो पोपटासारखा बोलू लागला. पळशी शिवारात साथीदारांच्या मदतीने बैलजोडी चोरल्याची कबुली त्याने दिली. ही बैलजोडी हर्सूल येथील सुलेमान कुरेशी यास दिल्याचे सांगितले. जनावरे वाहून नेण्यासाठी टेम्पो वापरल्याचे त्याने सांगितले. पोलिसांनी झटपट कारवाई करीत आरोपीचा टेम्पो आणि मोबाईल जप्त केला. तसेच बैलजोडी विक्रीतून मिळालेल्या रक्कमही जप्त केली.