औरंगाबाद : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथील श्री णमोकारतीर्थ येथे अरिहंत भगवंतांची ४५ फुटांची विशाल खङ्ासन मूर्ती निर्माण करण्यासाठी कर्नाटकमधून ४०० टन वजन असलेल्या ५१ फूट लांब आणि १६ फूट रुंद पाषणाचे शनिवारी (५ जून) चांदवड येथे आगमन होत असून, यावेळी प.पू. सारस्वताचार्य देवनंदीजी महाराज ससंघ यांचे मंगल सान्निध्य लाभणार असून, राज्याचे मंत्री छगन भुजबळ हे पाषाणाचे धार्मिक संस्कारासह स्वागत करणार आहेत.
जैन धर्माचा परिचय जगाला व्हावा यादृष्टीने समोशरणचे कार्य प्रगतिपथावर असून, योजनेप्रमाणे ही भव्य मूर्ती निर्माण करण्याचे काम सुरू होत आहे. कर्नाटकमधून १६४ चाकांच्या विशाल ट्रकमधून या पाषाणाचे श्री णमोकार तीर्थावर आगमन होत आहे.
याप्रसंगी भारतवर्षीय तीर्थक्षेत्र कमिटी राष्ट्रीय अध्यक्ष शिखरचंद पहाडिया, न्यायमूर्ती के.यू. चांदीवाल, राज्याध्यक्ष संजय पापडीवाल, महामंत्री भरत ठोळे, महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जमनालाल हाफावत, सुमेर काला, भूषण कासलीवाल, डी.यू. जैन यांच्यासह समाजातील गणमान्य व्यक्ती उपस्थित राहणार आहेत.
संघ संचालिका श्रद्धेय वैशालीदीदी, श्री णमोकार तीर्थ विश्वस्त मंडळ अध्यक्ष नीलम अजमेरा, तीर्थ विश्वस्त ललित पाटणी, संतोष पेंढारी, संतोष काला, महावीर गंगवाल, अनिल जमगे, प्रकाश सेठी, श्री णमोकार तीर्थावर पाषाणाच्या स्वागताची जय्यत तयारी करीत आहेत.
युवा महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष पारस लोहाडे समारंभाचा प्रत्येक क्षण अविस्मरणीय व्हावा या अनुषंगाने प्रयत्नशील आहेत, तर संचेती कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेत आहेत.
चौकट...
मुंबई- आग्रा राष्ट्रीय महामार्गावर चांदवडजवळ दिगंबर जैन संत प.पू. सारस्वताचार्य देवनंदीजी महाराज यांच्या प्रेरणेने श्री णमोकार तीर्थाचे निर्माणकार्य प्रगतिपथावर आहे. जैन धर्माचा परिचय आधुनिक पद्धतीने सबंध जगाला व्हावा, संतांची सेवा व सुरक्षा व्हावी, समाजातील मुलांसाठी दर्जेदार लौकिक व धार्मिक शिक्षणाचे केंद्र व्हावे, आरोग्याच्या उच्च दर्जाच्या सुविधा निर्माण व्हाव्यात, हा हेतू ठेवून श्री णमोकार तीर्थाची रचना करण्यात येत आहे.
कॅप्शन:
ट्रकमधून आलेल्या भव्य पाषाणाचे चांदवडनजीक घेतलेले छायाचित्र.