वाळूज महानगर: वाळूज महानगरात सोमवारी गणरायाचे जल्लोषात आगमन झाले. परिसरातील विविध गणेश मंडळ व नागरिकांनी गुलालाची उधळण करीत ढोल-ताशाच्या गजरात मिरवणूक काढून श्रीगणेश मूर्तीची स्थापना केली.
विघ्नहर्त्याच्या आगमनासाठी सकाळपासून गणेश भक्तांनी गणेश मूर्ती, सजावटीचे व पुजेचे साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती. गणरायाच्या आगमनामुळे गणेश भक्तांत उत्साहाताचे वातावरण पसरले होते.
गणेशोत्सवाची ओढ लागलेल्या गणेश भक्तांनी सोमवारी वाळूज महानगरात गणरायाचे जल्लोषपूर्ण वातावरणात स्वागत केले. येथील बजाजनगर, रांजणगाव, वाळूज, पंढरपूर आदी ठिकाणी विविध मंडळांचे पदाधिकारी व नागरिकांनी मूर्ती खरेदी करण्यासाठी सकाळपासूनच गर्दी केली होती.
गणेश मूर्ती खरेदी केल्यानंतर विविध मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून तसेच नागरिकांकडून सजवलेल्या वाहनात मूर्ती ठेवून ढोल-ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करीत वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. हे चित्र सकाळपासून सायंकाळपर्यंत सुरु होते. यावेळी गणेश भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत होता. मंडळाच्या ठिकाणी तसेच घरी नेल्यानंतर विधिवत पूजा-अर्चा व आरती करुन श्रीगणेशाची स्थापना करण्यात आली.
येथील बजाजनगरातील मोहटादेवी मंदिर, मोरे चौक, महाराणा प्रताप चौक, जयभवानी चौक येथे पंढरपूरातील पंढरपूर चौक, कामगार चौक येथे, रांजणगावातील ग्रामपंचायत कार्यालय परिसर, रांजणगाव फाटा, कमळापूर फाटा आणि वाळूज चौक येथे प्रामुख्याने विक्रेत्यांनी गणेश मूर्ती, सजावट व पुजेच्या साहित्याची दुकाने थाटली होती. त्यामुळे या ठिकाणी मंडळाचे पदाधिकारी व नागरिकांनी कुटुंबातील सदस्यांसह गणेशमूर्ती खरेदीसाठी गर्दी केली होती. त्यामुळे महानगरातील प्रमुख चौक दिवसभर गर्दीने फुलले होते.