ज्येष्ठा, कनिष्ठा आगमनाचा मुहूर्त यंदा रविवार, १२ सप्टेंबर रोजी घरोघरी महालक्ष्मीचे (गौरी) आगमन होणार आहे. गौरी आवाहन हे अनुराधा नक्षत्रावर करावे. हे नक्षत्र सकाळी ९.५० नंतर सुरू होते; परंतु सकाळी ११.४३ पर्यंत वैधृतीयोग आहे. त्यामुळे सकाळी ११.५० वाजेनंतर कधीही आवाहन करता येते.
--
महालक्ष्मी पूजन
सोमवार, १३ सप्टेंबर रोजी सकाळी ८.२३ वाजेनंतर दिवसभर कधी महालक्ष्मीचे पूजन करता येईल.
---
विसर्जन
मंगळवार, १४ सप्टेंबर रोजी गौरीचे विसर्जन करण्यात येणार आहे. सकाळी ७.०५ वाजेनंतर कधीही गौरीचे विसर्जन करता येईल.
-----------------------------------------------------------
शंका-समाधान
कोरोनाच्या दुष्टचक्रात काही कुटुंबातील कर्त्या पुरुषांचे निधन झालेले आहे. त्या घटनेस एक वर्ष पूर्ण झालेले नाही म्हणून त्यांच्या घरी महालक्ष्मी पूजन कसे करावे, असे प्रश्न विचारण्यात येत आहे.
यासंदर्भात सुरेश केदारे गुरुजी यांनी सांगितले की, घरात दु:खद घटना घडली असली तरी वार्षिक सण, उत्सव हे जेव्हाचे तेव्हाच करावे लागत असतात.
घरातील कर्ते पुरुषाचे निधन झाले असले तरी महालक्ष्मी सण साजरा करावा. महालक्ष्मी (ज्येष्ठा, कनिष्ठा) जशा अगोदरपासून उभ्या आहेत. तशाच त्यांची मांडणी करावी. त्यांना बसवून ठेवू नये किंवा नवीन मुखवटे आणू नये. जर मुखवटे खंडित झालेले असतील तर त्यांच्या धर्मशास्त्राच्या अभ्यासकांशी चर्चा करावी व पुढील निर्णय घ्यावा.
----
महालक्ष्मी येता माहेराला
गणरायाच्या आगमनानंतर दोन दिवसाने महालक्ष्मीचे घरोघरी आगमन होते. यास महालक्ष्मी माहेरला येते, असे म्हटले जाते. ज्येष्ठा, कनिष्ठा या आपला मुलगा व मुलीसह माहेरी येतात. त्यांच्यासाठी सडा, रांगोळी करून मायेच्या पायघड्या घातल्या जातात. त्यांच्या स्वागताला सारं घर आनंदाने न्हाऊन निघतं. तीन दिवसांचं त्यांचं माहेरपण; पण त्यात मायेचे कोडकौतुकाचे किती पदर दिसतात. त्या कौतुकाचंच तर नाव माहेर असतं. पहिल्या दिवशी तिचे जोरदार स्वागत केले जाते. दुसऱ्या दिवशी पूजन करून नैवेद्य दिला जातो आणि तिसऱ्या दिवशी महालक्ष्मीला निरोप दिला जातो. या दिवशी गृहिणी एकामेकीच्या घरी जाऊन तेथील महालक्ष्मीचे दर्शन घेतात.