औरंगाबाद : ‘सजविलेल्या ताटात महालक्ष्मीचे मुखवटे घेऊन सुवासिनी एकेक पाऊल पुढे टाकत मुख्य दरवाजातून घरात येत होत्या. बच्चे कंपनी कोणी टाळ, तर कोणी थाळी वाजवीत होते. परिवारातील अन्य सुवासिनी म्हणत होत्या ‘लक्ष्मी कशाने आली, सोनपावलाने आली...’ काही जण महालक्ष्मीवर फुलांची उधळण करीत होते. रविवारी (दि.१२) घरोघरी महालक्ष्मीच्या आगमनाचा साक्षीदार वरुणराजा ठरला. मुलाबाळासह ज्येष्ठा, कनिष्ठा महालक्ष्मीच्या आगमनाने मंगलमय वातावरण पसरले होते.
महालक्ष्मीच्या स्वागतासाठी घराबाहेर अंगणात रांगोळी काढण्यात आली होती. घराघरांमध्ये महालक्ष्मी व तिच्या बाळांना बसण्यासाठी आकर्षक मखर, सजावट करण्यात आली होती. त्यात विद्युत रोषणाईने आणखी चारचाँद लावले होते. महालक्ष्मीच्या स्वागतासाठी नोकरी, उद्योगाच्या निमित्याने बाहेर गावी राहणारे परिवारातील सर्व सदस्य एकत्र आले होते.
अनेक घरांत दोन पिढ्या, काही घरांत तीन पिढ्या, तर काही घरांत चार पिढ्यांच्या सदस्यांनी महालक्ष्मीचे स्वागत केले. पंचागानुसार सकाळी ११.५० वाजेनंतर महालक्ष्मीचे आवाहन करण्याचा मुहूर्त होता. त्यानुसार कोणी दुपारी तर कोणी सायंकाळी महालक्ष्मीचे आवाहन केले. घरातील सर्व सुवासिनी अंगणात आल्या होत्या. त्यातील दोघी जणींच्या हातात थाळी होती. त्यात ज्येष्ठा, कनिष्ठाचे मुखवटे व बाळाचे मुखवटे ठेवण्यात आले होते. अंगणातून घरात आतपर्यंत कोणी रांगोळी काढत होते, तर काही ठिकाणी जमिनीवर कुंकू व हळदीचे हाताचे ठसे मारत होते. ‘लक्ष्मी कशाने आली, लक्ष्मी सोनपावलाने आली. लक्ष्मी हाती, घोडा, पालखी घेऊन बाळासह आली. लक्ष्मी धन, धान्य, संपत्ती घेऊन आली’, असे म्हणत महालक्ष्मीचे सर्वांनी स्वागत करीत थाटात घरात आणले व त्यांची मखरात थाटात स्थापना केली. महालक्ष्मीला भरजरी साड्या नेसविण्यात आल्या होत्या. या सोहळ्याच्या निमित्ताने सर्व परिवार एकत्र आला होता. एक मंगलमय वातावरण निर्माण झाले होते.
चौकट
आज सकाळी ८.२३ वाजेनंतर महालक्ष्मीपूजन
रविवारी महालक्ष्मीचे आगमन झाले. सोमवारी (दि.१३) महालक्ष्मीचे पूजन करण्यात येणार आहे. पंचागानुसार सकाळी ८.२३ वाजेनंतर दिवसभर कधीही पूजन करता येणार आहे.