औरंगाबाद : इंग्लडहून आलेल्या दोन कोरोनाबाधित रुग्णांचे नमुणे पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आले आहेत. या दोन रुग्णांत कोरोना विषाणुचा नवा प्रकार (स्ट्रेन) आहे की, जुनाच विषाणू आहे, यावर ‘एनआयव्ही’च्या तपासणीतून शिक्कामोर्तब होणार आहे. त्यामुळे नेमका काय अहवाल येतो, याकडे आरोग्य यंत्रणेचे लक्ष लागले आहे.
शहरात इंग्लडहून आलेल्या एका महिलेचा आणि एका तरुणाचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. नाताळ आणि त्यानंतर शनिवार, रविवार सुटीमुळे दोन्ही रुग्णांच्या तपासणीचा अहवाल ‘एनआयव्ही’कडून अद्याप प्राप्त झालेला नाही. हा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर शहरातील पुढील परिस्थितीची दिशा ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा अहवाल नेमका काय येतो, कधी येतो, याची प्रतीक्षा केली जात आहे. आगामी दोन दिवसांत अहवाल प्राप्त होऊन नवा की जुनाच विषाणू हे स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (घाटी) अधिष्ठाता डा. कानन येळीकर म्हणाल्या, बाधित रुग्णांचे नमुने ‘एनआयव्ही’ला पाठविण्यात आलेले आहे. परंतु त्यांच्याकडून अहवाल येणे अद्याप बाकी आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुंदर कुलकर्णी म्हणाले, जिल्हा रुग्णालयात सध्या इंग्लडहून आलेला एकमेव रुग्ण दाखल आहे. या रुग्णाची प्रकृती स्थिर आहे.
राज्यात केवळ पुण्यात तपासणी
राज्यात केवळ ‘एनआयव्ही’मध्येच तपासणी होऊन नव्या स्वरुपातील कोरोना संसर्गाचे आगमन झाले आहे का, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. ही तपासणी औरंगाबादेत सुरू होण्यासाठी वेगळी यंत्रसामुग्री, स्वतंत्र प्रयोगशाळा लागेल. त्यामुळे आगामी काही दिवस या तपासणीसाठी पुण्यावरच अवलंबून राहावे लागणार आहे.