औरंगाबाद : दवाखान्याचे उद्घाटन, मुलाचे लग्न किंवा अन्य काही कार्यक्रम अशा अनेक निमित्ताने पं. जसराजजी यांचे अनेकदा आमच्या घरी येणे झाले. ते जेव्हा घरी यायचे, तेव्हा सुरांचा आनंद मिळायचा तो अनोखाच असायचा; पण त्यासोबतच त्यांचा एकंदरीतच सगळा वावर घराला उत्सवी स्वरूप देऊन जायचा, अशा पं. जसराजजी यांच्या बद्दलच्या भावना डॉ. भवान महाजन आणि डॉ. छाया महाजन यांनी व्यक्त केल्या.
पं. जसराजजी यांचे डॉ. महाजन यांच्या कुटुंबाशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध होते. या जिव्हाळ्याची नाळ जोडली गेली ती पैठण येथून. याबाबत सांगताना डॉ. महाजन म्हणाले की, त्यांचे वडील वैद्य तात्यासाहेब महाजन यांनी पं. जसराजजी यांच्या मोठ्या बंधूंना पैठण येथे गाण्याच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले होते. त्यावेळी पं. जसराजजीही त्यांच्या बंधूसोबत आले होते. त्यावेळी त्यांचे वय अवघे १० ते १५ वर्षांचे होते. त्यावेळी जसराजजी तबला वाजवायचे. यानंतर हे नाते अधिकाधिक दृढ होत गेले.
शास्त्रीय संगीतातील सूर्यास्तसंगीतमार्तंड पं. जसराज म्हणजे शास्त्रीय संगीतातला वचक, दरारा होता. त्यांच्या जाण्याने शास्त्रीय संगीतातील सूर्यास्त झाला, असे वाटत आहे. माझे गुरुजी गानमहर्षी अण्णासाहेब गुंजकर यांच्याकडे नांदेड येथे ते वारंवार यायचे. मराठवाड्याशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध होता. माझ्या गाण्याचे त्यांना फार कौतुक वाटायचे. आमचे गाण्याचे घराणे वेगवेगळे होते. त्यामुळे माझी गायनशैली त्यांच्यापेक्षा निराळी होती. असे असतानाही मी रचलेल्या अनेक बंदिशी त्यांनी ऐकल्या आणि त्यांच्यावर भरभरून प्रेम केले.- पं. नाथराव नेरळकर
माझ्या गायनाचे त्यांनी कौतुक केले बडोद्याला गाणे शिकत असताना पं. जसराज यांचा गायनाचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमात नवोदित कलाकार म्हणून मी केलेले गायन पं. जसराज यांना आवडले होते. त्यांनी माझ्या गायनाचे भरभरून कौतुक केले होते. कॉलेजमध्ये असताना त्यांचे गाणे मी खूप ऐकायचे. त्यांचे एक शिष्य माझ्यासोबत माझ्या महाविद्यालयातच होते. त्यांच्याकडूनही रियाजाच्या वेळी पंडितजींबद्दल खूप ऐकायला मिळायचे. त्यांच्यासारखे सूर लावणे जमावे म्हणून आम्ही सगळेच खूप मेहनत घ्यायचो. - पं. शुभदा पराडकर
बहुरंगी आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्वप्रसन्न व्यक्तिमत्त्व व प्रसन्न गायकी अशा एका वाक्यात पं. जसराज यांचे वर्णन करता येईल. मेवाती घराण्याची सौंदर्यपूर्ण गायकी त्यांनी स्वीकारली, जोपासली आणि प्रसारित केली. लडिवाळ आलापी, तितकीच लडिवाळ सरगम आणि उत्तमोत्तम बंदिशी ही त्यांच्या गायकीची वैशिष्ट्ये होती. आकाशवाणी येथे असताना अनेकदा त्यांच्याशी वार्तालाप करण्याचा योग आला. त्यातून त्यांच्या बहुरंगी आणि दिलखुलास स्वभावाचे दर्शन नेहमी होत असे. - पं. विश्वनाथ ओक
त्यांनी जीवनाची कर्तव्यता साधलीदैवी गुणांचा ठेवा घेऊन पं. जसराज जन्माला आले. चंदनासारखा इतरांना सुगंधित करण्याचा गुण त्यांना लाभला होता. संगीतासारख्या श्रेष्ठ कलेतील उपासनेने त्यांनी ज्ञान आणि मोक्ष दोन्ही मिळवून जीवनाची कर्तव्यता साधली आहे. - ह.भ.प. अंबरीश महाराज देगलूरकर
उत्तुंग गायकी असणारे गायकशास्त्रीय गायनाचा इतिहास पाहिला तर उत्तुंग गायकी असणारे जे गायक होते, त्यांच्यापैकीच एक म्हणजे पं. जसराज. भावप्रधान गायकी, त्यांची बंदिशींची निवड अतिशय उत्तम असायची. त्या बंदिशीतला अर्थ उलगडून सांगायची जी शैली असते, त्यात पं. जसराज अग्रभागी होते. अगदी फोनवर बोलतानाही त्यांनी सहजपणे गायलेल्या दोन ओळी मनाला सुखावून जाणाऱ्या असायच्या.- डॉ. भवान महाजन