छत्रपती संभाजीनगर : समृद्धी महामार्गावर वैजापूर ते सिंदखेडराजापर्यंत नैसर्गिकऐवजी आर्टिफिशियल फुलझाडांसह कोरीव दगडांच्या सजावटीचे काम हाती घेण्यात आले आहे. समृद्धी महामार्गाच्या ‘रोड हिप्नॉटीझम’ला कोट्यवधी खर्चून कृत्रिम फुलांमार्फत ब्रेक लावण्याचा हा उपक्रम आहे. वृक्षारोपणदेखील वर्षभरापासून सुरू झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
समृद्धीचे ११ डिसेंबर २०२२ रोजी लोकार्पण झाले. तेव्हापासून आजवर महामार्गावर झालेल्या अपघातांमुळेच हा मार्ग चर्चेत राहिला. मार्गाच्या आजू-बाजूला काहीही वृक्षवल्ली, हिरवळ चालकांना दिसत नसल्यामुळे ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊन अपघात होत असल्याचा निष्कर्ष तज्ज्ञांनी मध्यंतरी काढला. आता नैसर्गिक हिरवळ तत्काळ वाढून मोठी होणे शक्य नसल्यामुळे हा कृत्रिम उपाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हाती घेतला आहे. त्यासाठी विविध प्रकारची शिल्प मार्गावर उभारण्यात येणार आहेत. महामार्गावर होत असलेले अपघात रोखण्यासाठी याची मदत होईल, असा दावा करण्यात येत आहे.
रात्रीच्या प्रवासासाठी रिफ्लेक्टर वाढविले आहेत. रात्री प्रवासासाठी महामार्गावर माहितीचे रिफ्लेट बोर्ड आहेत. रस्ता संमोहन (‘रोड हिप्नॉटीझम’) होत असल्यामुळे रबलिंग सिप टाकल्या आहेत. दर टोल प्लाझाच्या प्रवेशावर १५ कि.मी. अंतरात ते टाकल्यामुळे चालक अलर्ट होतो. त्यात आता ‘रोड हिप्नॉटीझम’ होऊ नये, यासाठी आर्टिफिशियल वृक्ष-फुलांची भर पडणार आहे.
कोण आहे कंत्राटदार....हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील गणराज डेव्हलपर्स यांना या कामाचे कंत्राट देण्यात आले आहे. शहरातील शिल्पकार मेघराज शेळके यांना वैजापूर ते सिंदखेड राजापर्यंत काम करण्यासाठी उपकंत्राटदार म्हणून नेमण्यात आले आहे. दरम्यान, शेळके यांनी सांगितले, आर्टिफिशियल फुले, झाडांमुळे प्रवास करताना फायदा होईल. अपघात होऊच नयेत, यासाठी हा प्रयोग हाती घेतला आहे.
समृद्धीने घेतले १२५ बळी...समृद्धी महामार्गाचे पहिल्या टप्प्यातील ५०२ कि.मी.चे लोकार्पण होऊन ११ महिने, तर दुसऱ्या टप्प्यातील ८० कि.मी. मार्गाचे लोकार्पण होऊन सात महिने झाले आहेत. या ११ महिन्यांत महामार्गावर सर्व मिळून १२८५ अपघात झाले असून, त्यात सुमारे १२५ जणांचा बळी गेला आहे. सुरुवातीला टायर फुटून अपघात वाढल्यामुळे ताशी वेगाची १५० ही मर्यादा १२० वर आणली गेली. नायट्रोजन हवेचे सेंटर्स सुरू केले आहेत.