- संजय जाधव पैठण : मुद्रांकासाठी शेतकरी व विद्यार्थ्यांची अडवणूक केली जात असून, कृत्रिम टंचाईच्या नावाखाली मुद्रांक ग्राहकांकडून जास्तीची रक्कम वसूल करण्याचा प्रकार सध्या पैठण शहरात जोरात सुरू आहे. विशेष म्हणजे १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर उपलब्ध नसल्याचे विक्रेते सांगत आहेत, तर दुसरीकडे शहरातील विक्रेत्यांना दोन दिवसांपूर्वीच ५ हजार स्टॅम्प पेपर वितरित करण्यात आल्याचे कोषागार कार्यालयातून सांगण्यात आले आहे.
पीक कर्जासाठी कागदपत्रांत शेतकऱ्यांना १०० रुपयांचा मुद्रांक अत्यावश्यक करण्यात आलेला आहे. यामुळे तालुकाभरातील शेतकऱ्यांची स्टॅम्प पेपर खरेदीसाठी लगबग सुरू आहे. शैक्षणिक वर्षाचा प्रारंभ झाल्याने विद्यार्थ्यांनाही स्टॅम्प पेपरची सध्या गरज आहे. अशा परिस्थितीत पैठण शहरातील मुद्रांक विक्रेत्यांकडे खरेदीसाठी गेलेल्या शेतकऱ्यांना १०० रुपयांचा स्टॅम्प शिल्लक नसल्याचे सांगण्यात येत असून, अडवणूक केली जात आहे. जास्तीचे दाम मोजल्यास मात्र स्टॅम्प पेपर मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. पीक कर्जासाठी बँकेने स्टॅम्प पेपर अनिवार्य केल्याने मजबूर होत जास्तीचे दाम मोजून शेतकऱ्यांना स्टॅम्प पेपरची खरेदी करावी लागत आहे. काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब नाडे यांना सोमवारी पैठण शहरात १०० रुपयांचा स्टॅम्प मिळाला नाही. नवगावचे गणेश राक्षे यांनाही स्टॅम्प मिळाला नाही.
शहरातील विक्रेत्यांनी स्टॅम्प पेपरचा तुटवडा असून, वरूनच आले नाही तर कोठून देणार, असे सांगितले. वकिलासाठी स्टॅम्प पेपर खरेदीसाठी गेलेल्या तरुणास स्टॅम्प पेपर नसल्याचे सांगण्यात आले. मात्र, वकिलाचे नाव सांगताच पटकन १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर हातात मिळाला. काही शेतकरी १०० रुपयांचा स्टॅम्प पेपर खरेदीसाठी औरंगाबादला गेले. मात्र, तेथेही त्यांना स्टॅम्प पेपर मिळाला नाही. याबाबत काँग्रेसचे अनुसूचित जाती-जमाती सेलचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब नाडे यांनी जिल्हा मुद्रांक अधिकारी व पैठणच्या तहसीलदारांना निवेदन देऊन याबाबत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
पैठण शहरात ३९०० स्टॅम्प पेपर वितरितपैठण शहरात १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरची टंचाई आहे का, याबाबत पैठण कोषागार कार्यालयाचे उपकोषागार अधिकारी संजय ठेणगे यांना विचारले असता पैठण शहरातील आठ विक्रेत्यांना दोन दिवसांपूर्वी ३९०० स्टॅम्प पेपर सम प्रमाणात वितरित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आणखी ११०० स्टॅम्प कोषागारात शिल्लक असून, स्टॅम्प पेपरची टंचाई नसल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
मुद्रांक नाकारणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई करू१०० रुपयांचा स्टॅम्प पेपर शेतकऱ्यांना न देणाऱ्या मुद्रांक विक्रेत्यांवर शेतकऱ्यांनी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल. स्टॅम्प पेपरची टंचाई नसून विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना स्टॅम्पची विक्री करावी.- आबासाहेब तुपे, दुय्यम निबंधक, पैठण