बाजारसावंगी : पाणी पुरवठा करणाऱ्या गिरीजा मध्यम प्रकल्प परिसरातील विद्युत पुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाल्यामुळे बाजारसावंगीसह दवाखाना कॉलनीत तेरा दिवसांपासून निर्जळी निर्माण झाली आहे. यामुळे पाण्यासाठी नागरिकांचे हाल होत असून, हे रोहित्र कधी दुरुस्त होणार, असा प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत.
बाजारसावंगी गावाला गिरीजा मध्यम प्रकल्प परिसरातील विहिरीतून पाणी पुरवठा केला जातो. या परिसरात विद्युत पुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाले आहे, तसेच रेणुका माता मंदिराजवळील कुपनलिकेतील विद्युत मोटार नादुरुस्त झाली आहे. यामुळे तेरा दिवसांपासून गावावर पिण्याच्या पाण्याचे संकट कोसळले आहे. पाण्यासाठी नागरिक हवालदिल झाले असून, लवकरात लवकर रोहित्राची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नादुरुस्त रोहित्र बदलून मिळण्यासाठी रिपोर्ट पाठविण्यात आलेला आहे. लवकरच नवीन रोहित्र बसविण्यात येणार असल्याची माहिती वीज मंडळाचे सहाय्यक अभियंता पी. एम. काळे यांनी दिली.
कोट
गिरिजा मध्यम प्रकल्प परिसरातील विहिरीस विद्युत पुरवठा करणारे रोहित्र नादुरुस्त झाल्याने गावास पाणी पुरवठा करण्यासाठी अडचण निर्माण झालेली आहे. यामुळे गावातील काही भागास पाणी पुरवठा कमी अधिक प्रमाणात होत आहे. रेणुका माता मंदिराजवळील कुपनलीकेतील विद्युत मोटार दुरुस्ती केली असून, येथील हौदावर पाणी पुरवठा सुरू आहे.
-आप्पाराव नलावडे, सरपंच, बाजारसावंगी