औरंगाबाद : स्थानबद्धतेच्या कारवाईवेळी कराव्या लागलेल्या दहा लाख रुपयांच्या खर्चासह हॉटेलचालकाकडे महिन्याला तीस हजार रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ‘एमआयएम’ नगरसेविकेचे पती अरुण बोर्डे यांच्याविरुद्ध क्रांतीचौक ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी बोर्डे यांना अटकही करण्यात आली आहे. पदमपुरा भागातील साई रेसिडेन्सी हे हॉटेल अरुण बोर्डे यांनी चालविण्यासाठी घेतले होते. हॉटेलमालक नीता राणा यांना धमकावून हॉटेल बळकावण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. या प्रकरणी तीन वर्षांपूर्वी त्यांच्याविरुद्ध क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता तसेच एक वर्षासाठी स्थानबद्धतेची कारवाई करण्यात आली होती. हॉटेल चालविणारा संतोष जाधव (३४, रा. भीमनगर, भावसिंगपुरा) हादेखील या प्रकरणात आरोपी होता. प्रकरण न्यायालयात गेल्यावर पदमपुऱ्यातील हॉटेल बंद ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. न्यायालयाच्या आदेशाने दोन महिन्यांपूर्वी हे हॉटेल पुन्हा सुरू करण्यात आले. हॉटेलचालक संतोष जाधव हा बोर्डे यांचा नातेवाईक असून, बोर्डे यांनी त्याच्याकडे ३० एप्रिल रोजी खंडणीची मागणी केली होती. ‘स्थानबद्धतेच्या कारवाईतून बाहेर पडण्यासाठी आपणास दहा लाख रुपयांचा खर्च आला. हा खर्च तुझ्यामुळेच आल्याने दहा लाख रुपयांसह दरमहा तीस हजार रुपये दे,’ अशी मागणी करून बोर्डे यांनी वेळोवेळी धमकावून मारहाण केल्याची तक्रार जाधवने केली होती. या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले होते.
खंडणीप्रकरणी अरुण बोर्डे यांना अटक
By admin | Published: May 04, 2016 1:17 AM