छत्रपती संभाजीनगर : जपानमध्ये विद्यार्थी शाळा सुटल्यावर १५ मिनिटे स्वच्छतेवर भर देतात. याच धर्तीवर शहरातही अशा पद्धतीचा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासकांनी सांगितले. प्रत्येक शाळेत शाळा सुटल्यावर विद्यार्थी १५ मिनिटे आपला परिसर स्वच्छ करतील. मनपाकडून सर्वच शाळांना यासंदर्भात पत्र पाठविण्यात येणार आहे.
स्वच्छतेमध्ये देशात छत्रपती संभाजीनगर शहराचा क्रमांक २३ वा आहे. किमान टॉप टेनमध्ये येण्यासाठी मनपाकडून व्यापक प्रमाणात उपाययोजना करण्यात येत आहेत. १ ते १५ ऑगस्टपर्यंत महास्वच्छता अभियान राबविण्यात आले. लवकरच विविध शासकीय कार्यालयांमध्येही स्वच्छतेचा उपक्रम हाती घेतला जाणार आहे. आता शाळांमध्ये सफाई केली जाईल. येणाऱ्या पिढीला स्वच्छतेचे महत्त्व कळावे हा त्यामागचा उद्देश असल्याचे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी सांगितले.
आम्हाला कचरा द्या, आम्ही प्रक्रिया करूमनपा प्रत्येक शाळेत, महाविद्यालयात जाऊन सफाई करू शकत नाही. त्यांनी कचरा आम्हाला द्यावा, आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया करतो. लवकरच प्रत्येक शाळेचा परिसरही स्वच्छ व सुंदर दिसेल. जपानमध्ये विद्यार्थ्यांना शालेय जीवनापासूनच स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले जाते. शाळा, घराचा परिसर मुलेच स्वच्छ करतात. त्याच धर्तीवर शहरात हा उपक्रम राबविणार येणार असल्याचे त्यांनी सांगितले.