छत्रपती संभाजीनगर : लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर व धाराशिव जिल्ह्याचे नाव अनुक्रमे औरंगाबाद व उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ म्हणूनच राहिले. आता विधानसभा निवडणुकीतदेखील औरंगाबाद लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या औरंगाबाद पूर्व, औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्य या तिन्ही मतदारसंघाचे नाव या निवडणुकीपुरते तरी कायम राहणार आहे.
महाराष्ट्र शासनाने औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही शहरांचे नामांतर केले. केंद्र सरकारने या नामांतराला मान्यता दिल्यानंतर दोन्ही जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव असे झाले. मात्र लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर व धाराशिव लोकसभा मतदारसंघ असे न होता, औरंगाबाद आणि उस्मानाबाद असाच उल्लेख झाला होता.
औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाले असले तरी विधानसभेसाठी शहरातील तिन्ही मतदारसंघांना जुनीच नावे वापरली जाणार आहेत. औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन्ही लोकसभा मतदारसंघांची पुनर्रचना होईपर्यंत दोन्ही मतदारसंघाचे नाव कायम राहणार आहे, असे आयोगाकडून लोकसभा निवडणुकीदरम्यान स्पष्ट करण्यात आले होते. शहरातील तिन्ही मतदारसंघांतील राजकीय पक्षांच्या उमेदवारांना मतदारसंघात प्रचार करताना औरंगाबाद पूर्व, पश्चिम, आणि मध्य मतदारसंघाचे उमदेवार म्हणावे लागणार आहे. उस्मानाबाद शहरातील मतदारसंघासाठीदेखील असाच उल्लेख करावा लागेल. आगामी काळात जनगणना होणार आहे. त्यानंतर मतदारसंघाची पुनर्रचना कार्यक्रम हाती घेतला जाईल. तोपर्यंत आयोगाच्या दप्तरी या दोन्ही जिल्ह्यांची व त्यांच्या अंतर्गत मतदारसंघाची नावे जुनीच असतील.
सध्या जुनीच नावे असतीलनिवडणूक आयोगाने मतदारसंघांबाबत आजवर जो पत्रव्यवहार केला आहे, त्यानुसार मतदारसंघांची नावे जुनीच असतील. त्या येणाऱ्या काळात काही बदल झाले तर निश्चितपणे कळविण्यात येईल.- दिलीप स्वामी, जिल्हाधिकारी