छत्रपती संभाजीनगर : मणिपूर येथील दंगलीत ४४ पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला. शंभरपर्यंत धार्मिक स्थळ जाळण्यात आले. जम्मू-काश्मीरच्या राजौरीत ५ जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी एक शब्द बोलायला तयार नाहीत. कर्नाटक प्रचारात आणि ‘द केराळा स्टोरी’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत, असा आरोप सोमवारी एमआयएम पक्षप्रमुख असदोद्दीन ओवेसी यांनी येथे केला.
धुळे येथे जाण्यापूर्वी त्यांनी खा. इम्तियाज जलील यांच्या निवासस्थानी भेट दिली. यावेळी माध्यमांशी ओवेसी यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मणिपूरमध्ये भाजपची सत्ता आहे. तेथील दंगली थांबविणे हे त्यांचे कर्तव्य आहे. एका विशिष्ट समुदायाला टार्गेट करून त्यांची धार्मिक स्थळे जाळली जात आहेत. अतिरेकी काश्मीरमध्ये येऊन आपल्या जवानांना शहीद करीत आहेत. हिटलर कशा पद्धतीने वागत होता. त्याने जर्मनीत एका समुदायाविरुद्ध वातावरण निर्मिती केली. त्यानंतर ७० हजार नागरिकांना मारण्यात आले. त्यापूर्वी त्यानेही अशाच पद्धतीने चित्रपट निर्मिती केली होती. भारतातही हेच सुरू आहे. इतिहासापासून आपण काही तरी बोध घेतला पाहिजे.
पंतप्रधान अभिनेता असते तर आघाडीच्या अभिनेत्यांना मागे टाकले असते. कर्नाटक निवडणुकीसंदर्भात त्यांना छेडले असता त्यांनी नमूद केले की, काँग्रेस बजरंग दलावर बंदी आणण्याची निव्वळ पुंगी वाजवत आहे. यापूर्वी त्यांची सत्ता असताना का बंदी घातली नाही. भाजपने आता सत्ता असताना अल्पसंख्याक समाजावर बराच अन्याय केला. सरकार कोणाचे येईल, हे जनता १० मे रोजी ठरवेल.
शहरात लवकरच सभाछत्रपती संभाजीनगर शहरात लवकरच जाहीर सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. या सभेत खुर्च्या कमी, नागरिक जास्त असतील. बीआरएस पक्षाने येथे सभा घेतली त्यावर ओवेसी यांनी सर्वांना पक्ष वाढविण्याचा अधिकार असल्याचे सांगितले.