छत्रपती संभाजीनगर : विधानसभा निवडणुकीत महायुतीला मिळालेल्या भरघोस मतांच्या चर्चेबरोबरच मराठा आरक्षण आणि जरांगे फॅक्टरचीही जोरदार चर्चा आहे. त्याचवेळी मराठवाड्यातील ४६ मतदारसंघांत तब्बल २९ मराठा आमदार निवडून आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. विशेष म्हणजे ज्या भाजपच्या विरोधात मराठवाड्यातील मराठा समाज जाईल, अशी भीती व्यक्त होत होती, त्याच भाजपचे सर्वाधिक ११ मराठा आमदार निवडून आले आहेत.
मराठवाड्यातील नवनिर्वाचित ४६ आमदारांच्या यादीवर नजर टाकल्यास त्यातून स्पष्ट होते की, ४६ मध्ये ९ आमदार ओबीसी समाजाचे आहेत. पाच मतदारसंघ राखीव असल्याने त्याठिकाणी एससी प्रवर्गातील उमेदवार निवडून आले आहेत. दोन आमदार अल्पसंख्याक समाजातील (एक मुस्लीम व एक जैन) आणि एक आदिवासी समाजातील आमदार निवडून आला आहे. मराठवाड्यात सर्वाधिक ६ मराठा आमदार नांदेड जिल्ह्यातून निवडून आले आहेत. त्याखालोखाल छत्रपती संभाजीनगर, जालना आणि लातूर जिल्ह्यातून प्रत्येकी ४, तर परभणी, बीड आणि धाराशिव जिल्ह्यातून प्रत्येकी ३ मराठा आमदार निवडून आले आहेत. हिंगोली जिल्ह्यातून दोन मराठा उमेदवार विधानसभेत गेले आहेत.
यात सर्वांत आश्चर्याची बाब ही की, ज्या शरद पवार यांना ‘स्ट्राँग मराठा लिडर’ असे संबोधले जाते आणि त्यांचे मराठवाड्यातील मराठा समाजात मोठे वलय आहे, त्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही मराठा आमदार यंदा निवडून आला नाही. शरद पवार यांनी मराठवाड्यात १५ जागा लढविल्या. त्यामध्ये आठ मराठा उमेदवार दिले होते. त्यापैकी एकही निवडून आला नाही. शरद पवार यांच्या पक्षाचे एकमेव संदीप क्षीरसागर हे ओबीसी आमदार निवडून आले. विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रंगात असतानाच मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील तसेच ओबीसी आरक्षण बचाव समितीचे लक्ष्मण हाके यांच्यात जोरदार वाकयुद्धही रंगले. त्यामुळे जातीचे मोठ्या प्रमाणावर ध्रूवीकरण होईल, असे मानले जात असतानाच मतदारांनी हे सर्व झिडकारले आहे.
भाजपखालोखाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे ९ आमदार मराठा समाजातील आहे, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे सहा मराठा आमदार निवडून आले आहेत. अर्थात राज्यातील भाजप, शिंदेसेना, राष्ट्रवादी काँग्रेस (अप), काँग्रेस, उद्धवसेना, राष्ट्रवादी (शप) या प्रमुख पक्षांसह काही प्रबळ अपक्ष असे ६०च्या वर मराठा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. त्यापैकी २९ जण निवडून आले. अनेक मतदारसंघांत मराठा विरुद्ध मराठा अशीच लढत झाल्याचे पाहावयास मिळाली.
मराठवाड्यातून ९ ओबीसी आमदार मराठवाड्यातून ९ ओबीसी आमदारांपैकी बीड आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांतून प्रत्येकी दोन आमदार निवडून आले आहेत. जालना जिल्ह्यातून ओबीसी आमदार नाही. इतर पाच जिल्ह्यांतून प्रत्येकी एक ओबीसी आमदार निवडून आला आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या पाच मतदारसंघांतून अनुसूचित जातीचे उमेदवार निवडून आले आहेत. याव्यतिरिक्त इतर एकाही मतदारसंघातून अनुसूचित जातीचा उमेदवार निवडून आलेला नाही. नवबौद्ध समाजाचे दोन आमदार निवडून आले आहेत. मात्र त्यांचा आंबेडकरी चळवळीशी संबंध नसल्याची माहिती मिळत आहे. निवडून आलेले दोन अल्पसंख्यांक आमदार छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आहेत.
जिल्हानिहाय मराठा आमदारछत्रपती संभाजीनगर : ४जालना : ४परभणी : ३हिंगोली : २नांदेड : ६लातूर : ४बीड : ३धाराशिव : ३
तीन आमदार महाविकास आघाडीचेमराठवाड्यात निवडून आलेल्या २९ मराठा आमदारांपैकी २६ आमदार हे महायुतीचे आहेत. मराठा मतदार हा मोठ्या संख्येने महायुतीच्या बाजूने राहिला असण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीचे केवळ तीन आमदार मराठा समाजाचे आहेत. त्यामध्ये दोन उद्धवसेनेचे आणि एक काँग्रेसचा आमदार आहे.
जाणकार सांगतात..लोकसभा निवडणुकीच्या वेळी मराठा समाज महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला हे निर्विवाद आहे. विधानसभा निवडणुकीत पैशांचा प्रचंड वापर, लाडकी बहीण योजनेचा परिणाम आणि फुकटचे तीर्थाटन यावर नागरिक भाळले असल्याने महायुतीच्या बाजूने परिणाम दिसत आहे.- प्रा. राजेश करपे, माजी सदस्य, राज्य मागासवर्ग आयोग