छत्रपती संभाजीनगर : अत्यल्प पावसामुळे आधीच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खरीप हंगामातील पिकांची उत्पादकता निम्म्यापेक्षा खाली आल्याचे कृषी अभ्यासक सांगतात. दुसरीकडे गत महिन्यात जिल्ह्यात पाऊस पडल्यामुळे उभ्या पिकाचे नुकसान झाल्याच्या तब्बल ३ लाख ६९ हजार ९७६ ऑनलाइन तक्रारी विमा कंपनीकडे आल्या आहेत.
लहरी निसर्गाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री पीक विमा योजना आणली आहे. खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास अथवा पीक काढून ठेवल्यानंतर आग लागून अथवा अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्यानंतर ७२ तासांच्या आत विमा कंपनीकडे शेतकरी ऑनलाइन अथवा ऑफलाइन तक्रार करू शकतात. यानंतर विमा कंपनीचे प्रतिनिधी तक्रारदार शेतकऱ्याच्या शेतात जाऊन झालेल्या नुकसानाचा पंचनामा करून नुकसानभरपाई शेतकऱ्यांना दिली जाते. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी तीन वर्षांसाठी चोलामंडल एम. एस. जनरल विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळे जिल्ह्यात पीक नुकसानाची भरपाईही याच विमा कंपनीला द्यावी लागणार आहे. यानुसार जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पीक नुकसानाच्या तब्बल ३ लाख ६९ हजार ऑनलाइन तक्रारी विमा कंपनीकडे दाखल केल्या आहेत. विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी तातडीने तक्रारदारांच्या तक्रारीत तथ्य आहे अथवा नाही, हे पाहण्यासाठी सर्वेक्षण सुरू केले आहे. सूत्रांनी सांगितले की, आतापर्यंत विमा कंपनीने १ लाख २० हजार ३४० तक्रारींचे सर्वेक्षण पूर्ण केले आहे. अद्याप २ लाख ४९ हजार ६३६ तक्रारींची पडताळणी प्रलंबित आहे. सूत्रांनी सांगितले की, तक्रार करणाऱ्यांपैकी बहुतेक शेतकऱ्यांनी अतिवृष्टीमुळे पिकाचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
३२१ गावांतील शेतकऱ्यांना मिळणार ९३ कोटीसूत्रांनी सांगितले की, जून ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यात पावसाने वेळोवेळी खंड दिला होता. याचा परिणाम खरीप हंगामातील पिकांच्या वाढीवर झाला आहे. यावर्षी जिल्ह्यातील २० मंडळांतील ३२१ गावांमध्ये पावसाने २१ दिवसांपेक्षा अधिक काळ खंड दिला होता. यामुळे या गावांमधील शेतकऱ्यांना एकूण पीक विम्याच्या रकमेपैकी २५ टक्के अग्रीम देण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. या आदेशानुसार विमा कंपनीने अद्याप शेतकऱ्यांना ही रक्कम दिलेली नाही. दिवाळीपूर्वी ही रक्कम देण्याची ग्वाही कृषिमंत्र्यांनी दिली.