पैठण : तालुक्यातील गोदावरी नदी पात्रातील पाणी कमी झाल्याने वाळूमाफियांनी आपला मोर्चा या नदीकडे वळविला असून, येथून दररोज शेकडो ब्रास वाळूचा अवैध उपसा केला जात आहे. महसूल प्रशासन मात्र याबाबत कडक भूमिका घेत नसल्याने वाळूमाफियांचे धाडस वाढले आहे.
पैठण तालुक्यातील गोदावरी नदीपात्रातील अनेक ठिकाणचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे पैठणपासून तर हिरडपुरीपर्यंत नदीपात्रातील वाळू उघडी पडली आहे. ही बाब वाळू माफियांच्या पथ्यावर पडली असून, ते या नदीपात्रातून बेसुमार वाळू उपसा दिवस-रात्र करीत आहेत. विशेष म्हणजे महसूल विभाग वाळू माफियांबाबत कडक भूमिका घेत नसल्याने त्यांचे धाडस वाढले आहे. विशेष म्हणजे अवैधरित्या उपसा केलेली ही वाळू खुल्या बाजारात अव्वाच्या सव्वा दराने विकली जात आहे. शासकीय बांधकाम आणि घरकुल बांधकामासाठी मात्र वाळू मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
या ठिकाणाहून सुरू आहे वाळू उपसागोदापात्रातून पैठण, पाटेगाव, नवगाव, तुळजापूर, आपेगाव, टाकळी, नायगाव, हिरडपुरीसह वीरभद्रा नदीपात्रातूनही सर्रासपणे ट्रॅक्टरच्या यारीच्या साह्याने वाळू उपसा करून ती रात्री छत्रपती संभाजीनगर ते पैठण, पैठण ते पाचोड, पैठण ते गेवराईसह मधल्या मार्गे बिनधास्त वाळू वाहतूक सुरू आहे.