औरंगाबाद : ‘दख्खनचा ताज’ म्हणजे बीबी का मकबरा परिसरातील उंचवट्यावर पुन्हा एकदा उत्खनन केले जात आहे. यापूर्वी उत्खननात याठिकाणी मकबरा बांधकाम काळातील स्नानगृह, शौचालयासारखा दगडी, चुन्याचे बांधकाम असलेला पाया, अवशेष आढळले होते. आता या मलब्याखाली आणखी काय दडलंय, याकडे भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्या अधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
भारतीय पुरातत्व सर्वेक्षणच्याऔरंगाबाद सर्कल कार्यालयाकडून १४ सप्टेंबर २०२१ रोजी मकबऱ्यासमोरील उजव्या बाजूला असलेल्या उंचवट्यावर ४० मीटर बाय ४० मीटर परिसरात उत्खनन सुरू करण्यात आले होते. यातून समोरच्या भागात चार ते सहा फूट खोलपर्यंत उत्खनन करून मलबा हटविण्यात आला होता. तेव्हा विटा, चुना, दगडी मध्ययुगीन बांधकामाचे अवशेष उघडे पडले.
२००५ ते २००९ दरम्यान असलेल्या अधीक्षकांनी मकबऱ्यासमोरील जागेत काही पुरातत्व अवशेष असल्याची शक्यता व्यक्त केली होती. त्यानुसार वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून खोदकाम करण्यात आले. परंतु आणखी बरीच जागा या ठिकाणी आहे. अखेर या जागेतही आता उत्खनन सुरू आहे. आगामी १० ते १२ दिवसांत या मलब्याखाली काय आहे, हे स्पष्ट होईल, असे पुरातत्व सर्वेक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सायंटिफिक क्लिअरन्स, डेब्रिज क्लिअरन्स...एस्क्लेव्हेशन, सायंटिफिक क्लिअरन्स, डेब्रिज क्लिअरन्स (मलबा साफ करणे) अशी उत्खननाची वर्गवारी असते. सध्या या जागेत मोठ्या ब्रशसह विविध साहित्याच्या मदतीने माती हटविण्याचे काम केले जात आहे. माती हटताच दगडाचे अवशेष दिसत आहेत. याठिकाणी नेमके काय आहे, हे आगामी दिवसांत स्पष्ट होईल.