लातूर : अर्थसंकल्पामध्ये आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक यांच्या मासिक मानधनात दीड हजार रूपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातील ६ हजार ११५ हजारांहून अधिक आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तकांना या वाढीव मानधनाचा लाभ होणार आहे.
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आशा स्वयंसेविका, गट प्रवर्तक कार्यरत आहेत. आरोग्य यंत्रणा, सेवाभावी संस्था, ग्रामस्थ, समाजातील अन्य घटक यामध्ये आरोग्यासंदर्भात जागरूकता, सुसंवाद, समन्वय, प्रोत्सहन, वाटाघाटी निर्माण करण्याच्या दृष्टीने आशा स्वयंसेविका सामाजिक दुवा म्हणून काम करतात. आरोग्य संस्थेतील प्रसुतीत वाढ करणे, मलेरिया, क्षयरोग, साथीचे रोग आदी उपचारासाठी मदत करणे, मोफत असलेल्या संदर्भ सेवेचा प्रचार करणे, कुटुंब कल्याणाचा प्रचार, किरकोळ आजारांवर उपचार, माता व बाल आरोग्यविषयक प्रबोधन, बालकांचे लसीकरण आदी कामे करणे, जन्म मृत्यू नोंदणीमध्ये मदत करणे, ग्राम आरोग्य पोषण दिनामध्ये सहकार्य करणे इत्यादी कामे आशा स्वयंसेविका करतात. त्यामुळे अर्थसंकल्पामध्ये मानधन वाढीची घोषणा करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यात १९०६ आशा स्वंयसेविका...लातूर विभागात एकूण ५ हजार ८२८ आशा स्वयंसेविका, २८७ गट प्रर्वतक आहेत. त्यानुसार लातूर जिल्ह्यातील १ हजार ९०६, नांदेड १ हजार ६४५, उस्मानाबाद १ हजार २०७, हिंगोली १ हजार ७० आशा स्वयंसेविका आहेत. लातूर, नांदेड प्रत्येकी ८९ तर उस्मानाबाद ६१ आणि हिंगोलीत ४८ गट प्रर्वतक आहेत. यापूर्वी आशा स्वयंसेविकांना ३ हजार ५०० रूपये मानधन होते, ते आता अर्थसंकल्पातील तरतुदीमुळे ५ हजार रूपये झाले. तर गट प्रवर्तकांना ४ हजार ७०० रूपयांवरून ६ हजार २०० रूपये मानधन झाले आहे.