औरंगाबाद : चातुर्मासातील पहिली अमावास्या म्हणजे आषाढ अमावास्या. हा दिवस दीप अमावास्या म्हणूनही ओळखला जातो. यादिवशी घरातील निरांजन, समई, पंचारती, कंदिल, चिमणी, पणती, दगडी दिवा, दिवटी, लामण दिवा, अशा विविध प्रकारच्या दिव्यांची स्वच्छता करून त्याचे पूजन केले जाते आणि दिव्यांप्रती, अग्नीप्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते. या परंपरेनुसार सोमवारी घरोघरी दीप अमावास्येनिमित्त दीपपूजन करण्यात येईल.
सद्य:स्थितीत आषाढी अमावास्या ही दीप अमावास्येपेक्षा गटारी अमावास्या म्हणूनच जास्त ओळखली जात आहे. याचा नकारात्मक अर्थ सध्या सर्वत्र रुजत असून, नव्या पिढीमध्येही हाच अर्थ रुजत चालला आहे. आषाढी अमावास्येला दिव्यांचे पूजन करून ते प्रज्वलित केले जातात आणि त्यांना पक्वान्नांचा नैवेद्य दखविला जातो. हे दीपा, तू सूर्यरूप व अग्नीरूप आहेस. तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस, असे म्हणत दिव्याप्रती कृतज्ञता अर्पण केली जाते. आषाढी अमावास्येला ‘दीपान्वित अमावास्या’ असेही म्हटले जाते. आषाढी अमावास्येलाच दिव्यांचे महत्त्व का, याविषयी असे सांगितले जाते की, आषाढी अमावास्येनंतर श्रावणाचा पवित्र महिना सुरू होतो. कोणत्याही पवित्र कार्याची सुरुवात दीप प्रज्ज्वलित करून होते. दिवा हा सत्कर्माचा साक्षीदार असतो. श्रावण महिन्यात विशेष सत्कर्म करण्याची परंपराच आहे. त्यामुळे श्रावणाच्या स्वागतासाठी दीपपूजन करण्यात येते, असे काही ठिकाणी मानतात.
दीप अमावास्येचे शास्त्रीय कारणआषाढी अमावास्येलाच दीपपूजन का, हे सांगताना सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षिका सुमन चिंचोलीकर म्हणाल्या की, आषाढानंतर येणाऱ्या श्रावणाचे वैशिष्ट्य म्हणजे भरपूर पाऊस व अंधारून येणे. त्यामुळे पूर्वीच्या काळी श्रावणसरी सुरू झाल्या की, घरात जास्तीत जास्त दिवे लागायचे. म्हणूनच श्रावणाच्या आधी घरात अडगळीत ठेवलेले, धुळीने माखलेले दिवे, समया, निरांजन, लामणदिवे या सर्वांना एकत्र करून घासून पुसून लख्ख करून ठेवण्याचा हा दिवस असतो.