:कोरोनाची धास्ती; मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत महापुजा व विधी
कोरोनाची धास्ती : मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत महापूजा व विधी
वाळूज महानगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर छोट्या पंढरपुरात यंदा आषाढी यात्रा साधेपणाने साजरी करण्यात येणार आहे. सोमवारी (२०) मध्यरात्री मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत महाभिषेक, पुजा, आरतीसह विविध विधी पार पडणार असून, भाविकांसाठी मंदिराचे द्वार बंद राहणार आहे.
दरवर्षी छोट्या पंढरपुरात आषाढी यात्रेसाठी भाविकांची मोठी गर्दी उसळते. श्री विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी लाखो भाविक तसेच वारकरी दिंड्या व पालखीसह छोट्या पंढरपुरात दाखल होतात. दोन वर्षांपासून कोरोनाचे संकट आल्यामुळे शासनाने यात्रा, धार्मिक स्थळे आदी ठिकाणी गर्दी करण्यास निर्बंध घातले आहेत. गतवर्षीसुध्दा छोट्या पंढरपुरातील आषाढी यात्रा रद्द करण्यात आली होती. यंदाही कोरोनाचा धोका टळला नसल्यामुळे शासनाच्या आदेशावरून पोलीस प्रशासनाने यात्रा आयोजनावर बंदी घातली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वळदगाव - पंढरपूर श्री विठ्ठल - रुख्मिणी संस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या आदेशाचे पालन करीत साधेपणाने आषाढी यात्रा साजरी करण्याचा निर्णय घेतला. आषाढी यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली. श्री विठ्ठल - रुख्मिणी मंदिरातील मूर्ती, मुकुटाची स्वच्छता करण्यात आली. आषाढी यात्रेच्या आदल्या दिवशी सोमवारी बॉम्ब शोधक - नाशक पथकाने मंदिराची पाहणी करून सुरक्षेचा आढावा घेतला. श्री विठ्ठल भक्तांनी छोट्या पंढरपुरात न येता घरातून दर्शन घेण्याचे आवाहन संस्थानचे अध्यक्ष राजेंद्र पवार व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
फोटो ओळ- छोट्या पंढरपुरातील श्री विठ्ठल-रुख्मिणी मंदिरावर अशी आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. इन्सॅटमध्ये श्री विठ्ठल-रुख्मिणी मूर्ती.
------------------------