अशोक चव्हाण अचानक औरंगाबादेत, मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर ‘राजकीय चर्चा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:49 PM2019-06-04T22:49:15+5:302019-06-04T22:50:00+5:30
राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली.
औरंगाबाद : राज्याचे माजी मुख्यमंत्री व प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेले अध्यक्ष अशोकराव चव्हाण यांचे आज सायंकाळी मुंबईहून औरंगाबादला आगमन झाले व मोजक्याच पदाधिकाऱ्यांबरोबर त्यांनी राजकीय चर्चा केली.
आमदार सुभाष झांबड, जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल, शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेवराव पवार, माजी खासदार तुकाराम रेंगे पाटील, काँग्रेस सेवादलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, जि.प.चे माजी अध्यक्ष श्रीराम महाजन, माजी उपाध्यक्ष सुरेंद्र सोळुंके पाटील, प्रदेश काँग्रेसचे सचिव अशोक सायन्ना, नगरसेवक भाऊसाहेब जगताप, माजी नगरसेवक नारायणअण्णा सुरगोणीवार, शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, प्रदेश महिला काँग्रेसच्या सचिव मीनाक्षी बोर्डे-देशपांडे, जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस किरण पाटील डोणगावकर, डॉ. पवन डोेंगरे, योगेश मसलगे पाटील, काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे शहराध्यक्ष अनिल मालोदे, यशवंत कदम आदी मोजके कार्यकर्ते विमानतळावर दाखल झाले होते. ‘सुभाष झांबड हम तुम्हारे साथ है’ अशी साद चव्हाण यांनी घालताच झांबड यांनीही, हम भी तुम्हारे साथ है’ असा प्रतिसाद दिला.
काही मोजक्या कार्यकर्त्यांना चर्चा करण्यासाठी सोबत घेऊन अशोक चव्हाण गाडीत बसले. अब्दुल सत्तार यांचा भाजपतील संभाव्य प्रवेश, त्याचे जिल्ह्याच्या राजकारणावर होणारे परिणाम, त्यांच्या सोबत जिल्हा परिषदेतील काँगेसचे किती सदस्य जाऊ शकतील, सत्तारांना भाजप प्रवेशासाठी होत असलेला विरोध, यावर ही चर्चा झाली असल्याचे समजते.
जिल्हा परिषदेतील काँग्रेसच्या अधिकाधिक सदस्यांना रोखण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यादृष्टीने चव्हाण यांची आजची छोटेखानी भेट महत्त्वाची ठरणार आहे.
कोणत्याही परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीला सोबत घेऊन आगामी विधानसभा निवडणुका न लढल्यास काही खरे नाही, असे मत अनेक पदाधिकारी विमातनळावर अशोक चव्हाण येण्यापूर्वी व्यक्त करीत होते. शिवाय राष्टÑवादी काँग्रेसचे इंदिरा काँग्रेसमध्ये लवकरात लवकर विलीनीकरण व्हावे, अन्यथा राष्टÑवादी काँग्रेसशी कायमची फारकत तरी घ्यावी, असेही मत काही पदाधिकारी व्यक्त करीत होते.
नंतर चव्हाण कारने नांदेडकडे रवाना झाले. ते उद्या तिथे ईद मिलनच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.