औरंगाबाद : ४१ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. २६ सप्टेंबर रोजी दुपारी ४ वाजता समारोपाच्या कार्यक्रमाला राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष डॉ. राजेश करपे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
लोकसंवाद फाउंडेशनतर्फे मराठवाडा साहित्य परिषदेचे ४१ वे मराठवाडा साहित्य संमेलन येथील मसापच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित केले आहे. या संमेलनाची माहिती देण्यासाठी मसाप आणि लोकसंवाद फाउंडेशनच्या पदधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेण्यात आली. मसापचे अध्यक्ष तथा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, कार्यवाह डॉ. दादा गोरे, कोषाध्यक्ष कुंडलिक अतकरे, आयोजक समितीचे मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण, समन्वयक डॉ. रामचंद्र कालुंखे, उपाध्यक्ष डॉ. फुलचंद सलामपुरे यांची उपस्थिती होती.
यावेळी डॉ. करपे म्हणाले, उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आ. सतीश चव्हाण, मसापच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष मधुकर मुळे उपस्थित असणार आहेत. हे संमेलन आयोजित करण्यासाठी अत्यंत कमी कालावधी मिळाला आहे. नियोजनासाठी २५ समित्या बनविण्यात आल्या असून, याशिवाय मुख्य आयोजक समितीही कार्यरत आहे. संमेलनात ज्वलंत विषयावर ४ परिसंवाद, दोन कविसंमेलने, एक कथाकथन, मुलाखत, सांस्कृतिक कार्यक्रम आणि ग्रंथ प्रदर्शन हे कार्यक्रम आयोजित केल्याचे डॉ. करपे यांनी सांगितले. मुख्य कार्यवाह डॉ. राम चव्हाण यांनी लोकसंवादच्या बैठकीत डॉ. राजेश करपे यांची बहुमताने संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी निवड केल्याचे सांगितले. यावेळी आयोजक समितीचे सहकार्यवाह डॉ. कैलास अंभुरे, डॉ. गणेश मोहिते, स्मरणिका संपादक डॉ. हंसराज जाधव, सदस्य डॉ. रविकिरण सावंत, प्रा. अर्जुन मोरे, प्रा. बंडू सोमवंशी उपस्थित होते.
२० वर्षांनंतर औरंगाबादेत संमेलनमराठवाडा साहित्य संमेलन २००१ नंतर तब्बल २० वर्षांनी औरंगाबाद शहरात होत असल्याची माहिती कौतिकराव ठाले पाटील यांनी दिली. देगलूरचे संमेलन रद्द झाल्यामुळे तरुण रक्ताच्या युवा प्राध्यापकांना संमेलन आयोजित करण्याची संधी दिली. संमेलनाचे अध्यक्ष साहित्यिक बाबू बिरादर असणार आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या भीतीमुळे लवकर घेण्यात येत असल्याचेही ठाले पाटील यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांमुळेच राजकीय नेत्यांना बंदीअखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांना बोलावल्यास प्रसारमाध्यमे त्यांच्या भाषणालाच महत्त्व देतात. आमच्या साहित्यिकांना प्रसारमाध्यमात स्थान मिळत नाही. त्यामुळे त्या व्यासपीठावर बंदी घालण्याची भूमिका घेतली. मात्र मराठवाडा साहित्य संमेलनात राजकीय नेत्यांचा वावर पहिल्यापासूृन असून, तो यापुढेही कायम राहील, असेही ठाले यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा : - मराठवाडा मुक्तीचा लढा एका जातीच्या नाही, तर लोकशाहीला मारक प्रवृतीच्या विरोधात होता- संतपीठाचे दिक्षापीठ होऊन आधुनिक संत निर्माण व्हावेत