राजू दुतोंडे , सोयगाव वयाची अठरा वर्षे मुलगी म्हणून राहिलेल्या एका मुलीच्या जीवनात एका शस्त्रक्रियेने बदल घडून आला. लिंगपरिवर्तनानंतर अश्विनीचा आश्विन झाला. निंबायतीसारख्या छोट्याशा गावात घडलेल्या या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त होत आहे. गावात शाळेत, महाविद्यालयात मुलगी असलेली ती आज तो म्हणून वावरत असल्याने सर्वांना कुतूहल वाटत आहे. सोयगाव तालुक्यातील निंबायती गावात एका अतिसामान्य कुटुंबात अश्विनी राकडे हिचा जन्म झाला. वयाच्या अकराव्या वर्षीच तिच्या वडिलांचा मृत्यू झाला. आईने मोलमजुरी करून कुटुंब चालविले. मोठी मुलगी असलेल्या अश्विनीने आईला हातभार लावला; परंतु तिला पोटाचा विकार झाल्याने आई चिंतेत असे. गेल्या सहा वर्षांपासून तिच्यावर पोटाच्या विकाराचा उपचार सुरू होता. जळगाव, पाचोरा आदी ठिकाणी उपचार करण्यात आले; परंतु पोटाचा विकार वाढतच होता. असे असताना तिने बारावीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. नुकतीच तिने बारावी परीक्षा दिली. दि. ११ एप्रिल रोजी पोटाचा त्रास जास्त होऊ लागल्याने औरंगाबाद येथे शासकीय वैद्यकीय रुग्णालयात (घाटी) दाखल करण्यात आले. तेथे तपासण्या करण्यात आल्या. तेव्हा डॉक्टरांनी मुंबई येथे हलविण्याचा सल्ला दिला. बॉम्बे हॉस्पिटल अँड मेडिकल रिसर्च सेंटरमध्ये तिला दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी विविध तपासण्या केल्या. यात तिच्यामध्ये पुरुषाचे गुणधर्म आढळून आले. डॉ. सी. एम. नरियाणी, डॉ. अंशुमन, डॉ. पूनम खेरा यांच्या पथकाने केलेल्या उपचारात तिच्या स्त्री जातीच्या लिंगाविषयी शंका वाटली, त्यामुळे लिंगपरिवर्तन करण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. दि. २४ एप्रिल रोजी लिंगपरिवर्तन करून पुरुष लिंग प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली आणि अठरा वर्षे असलेली अश्विनी आश्विन झाला. १५ दिवसांच्या निरीक्षणानंतर ती पूर्णपणे पुरुष असल्याचे सिद्ध झाल्यानंतर सुटी देण्यात आली. अश्विनी म्हणून दवाखान्यात गेलेली आश्विन म्हणून परत आल्यामुळे गावकर्यांना आश्चर्याचा धक्का बसला. गावकरी हे आश्चर्य पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत, तर मुलगी आता मुलगा झाल्याचा आनंद कुटुंबीय व्यक्त करीत आहेत. या विषयी गावातील काहींशी चर्चा केली असता अश्विनीमध्ये मुलाचे गुणधर्म होते. शेतामधील पुरुषाची सर्व कामे ती करीत होती. रात्री-अपरात्री शेतामध्ये जाण्यास घाबरत नव्हती; परंतु मुलगी असल्याने तिला मुलींमध्येच किंवा महिलांमध्येच राहावे लागत असे. सोयगावच्या संत ज्ञानेश्वर महाविद्यालयात ती शिक्षण घेत आहे. ती मुलींसोबत येथे ये-जा करीत होती. अठरा वर्षे मुलगी म्हणून जगलेल्या अश्विनीचे आयुष्य पूर्णपणे बदलून गेले आहे. अडीच लाख रुपये उपचारासाठी खर्च तिच्या बदलासाठी आईने कष्टातून मिळविलेले अडीच लाख रुपये वैद्यकीय उपचारासाठी खर्च झाले आहेत. पूर्वी मुलीचे ड्रेस, लांब केस असणारी आज मुलांचे कपडे घालून फिरत आहे. मैत्रिणींना संकोच, नवीन मित्र भेटले अश्विनी मुलगा असल्याचे कळाल्यानंतर तिच्या मैत्रिणी आश्चर्यचकित झालेल्या आहेत आणि कालपर्यंत तिच्यासोबत राहणार्या मैत्रिणींना आज मात्र सोबत राहण्यास संकोच वाटत आहे. नवीन मित्र मात्र तिला भेटले आहेत. आश्विन आता मुलांमध्येच राहत आहे. आश्चर्यचकित करणार्या घटनेमुळे निंबायती गावात याच विषयाची सध्या चर्चा सुरू आहे.
अश्विनीचा झाला आश्विन...
By admin | Published: May 16, 2014 12:34 AM