औरंगाबाद : मराठवाडा साहित्य परिषदेकडून संमेलनाध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ साहित्यिक भारत सासणे यांच्या नावाचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. संमेलनाध्यक्ष होण्यासाठी आपण होकार दिल्याचे सासणे यांनी गुरुवारी 'लोकमत'शी बोलताना सांगितले.
सासणे म्हणाले की, काही दिवसांपूर्वीच याविषयीची विचारणा झालेली होती आणि त्यांच्याकडून प्रस्ताव येताच मी नाशिक येथे होणाऱ्या ९४व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाच्या प्रस्तावाला होकार कळविलेला होता. सासणे यांच्यासोबतच ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर, संत आणि लोकसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, विचारवंत जनार्दन वाघमारे यांच्याकडूनही संमेलनाध्यक्षाच्या प्रस्तावासाठी होकार आलेला आहे. त्यामुळे या विद्वान आणि ज्येष्ठ- श्रेष्ठ साहित्यिकांमधून नेमकी कुणाची निवड करायची, हे ठरविताना महामंडळाच्या अध्यक्षांसह सर्व १८ सदस्यांचा कस लागणार हे निश्चित.
साहित्य महामंडळाचे मौनदि. २० जानेवारीपर्यंत घटक संस्था आणि संलग्न संस्थांनी संमेलनाध्यक्ष पदासाठीची त्यांची प्रस्तावित नावे साहित्य महामंडळाकडे पाठवायची होती. यानुसार संमेलनाध्यक्ष पदासाठी एकूण किती नावांचे प्रस्ताव आले आहेत, याविषयी विचारणा केली असता साहित्य महामंडळाने यावर मौन बाळगणेच पसंत केले. याविषयीचा खुलासा दि. २३ रोजी नाशिक येथे होणाऱ्या बैठकीतच केला जाईल, असे साहित्य महामंडळाचे कार्यवाह डॉ. दादा गोरे यांनी स्पष्ट केले.