औरंगाबाद : भाजीपाला आणण्यासाठी जात असताना रस्त्यावर खेळत असलेल्या आपल्या पाच वर्षांच्या मुलीवर लक्ष ठेवण्यास आईने घराबाहेर मोबाईल बघत बसलेल्या १७ वर्षांच्या तरुणास सांगितले. ज्या तरुणाला लक्ष ठेवायला सांगितले, त्याच तरुणाने मुलीला घरात नेऊन अत्याचार केल्याची घटना शनिवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास मुकुंदवाडी ठाण्याच्या हद्दीत घडली.
या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात 'पोक्सो' कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्याच्या हद्दीतील एका ठिकाणी पीडित मुलीची आई व इतर तीन महिला सोबत भाजीपाला आणण्यासाठी शनिवारी सायंकाळी पाच वाजता परिसरातील बाजारात जात होत्या. पीडितेसोबत तिच्याच वयाचा शेजाऱ्याचा एक मुलगा खेळत होता. दोघेही लहान असल्यामुळे पीडितेच्या आईने बाहेर मोबाईल बघत बसलेल्या तरुणास आपल्या लहान मुलीकडे लक्ष देण्यास सांगितले. आम्ही तासाभरात परत येत असल्याचेही कळविले. घराशेजारील चारही महिला बाजारात गेल्यामुळे आजूबाजूला कोणीही नव्हते.
हेही वाचा - संशयाचा फायदा भेटला; मुलाच्या खुनाच्या आरोपातून वडिलांची निर्दोष मुक्तता
गोड बोलून त्या तरुणाने लहान मुलीला तिच्याच घरात नेले व तिच्यावर अत्याचार केला व नंतर तो निघून गेला. भाजीपाला घेऊन पीडितेची आई घरी आली तेव्हा मुलगी रडत होती. तिला सांगताही येत नव्हते. शेवटी आईने मुलीला विश्वासात घेऊन विचारल्यानंतर घटनाक्रम समजला. पीडितेचे वडील कामगार असल्यामुळे ते सायंकाळी उशिरा घरी आले. त्यांना घटना सांगितल्यानंतर रविवारी सकाळी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात पीडितेच्या आईने तक्रार दिली. यानंतर 'पोक्सो' कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मुकुंदवाडी पोलिसांची तत्परतामुकुंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रम्हा गिरी यांनी घटनेचे गांभीर्य ओळखत तक्रार येताच तत्काळ गुन्हा दाखल करीत आरोपी विधिसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेतले. या घटनेचा तपास मार्गदर्शक नियमानुसार उपनिरीक्षक वैशाली गुळवे यांच्याकडे देण्यात आला. त्यांनीही महिला दक्षता समितीच्या सदस्यांना बोलावत ‘इन कॅमेरा’ जबाब नोंदविला. तसेच विधिसंघर्षग्रस्त तरुणाचाही जबाब घेतला. यात त्याने अत्याचार केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.